Gondia : नवेगाव-कोहमारा मार्गावर ट्रॅव्हल्स आणि ट्रकची भीषण धडक ; सहा प्रवासी झाले गंभीर जखमी
By अंकुश गुंडावार | Updated: August 27, 2025 14:48 IST2025-08-27T14:45:22+5:302025-08-27T14:48:40+5:30
जखमींमध्ये सहा महिन्याच्या चिमुकलीचाही समावेश : नवेगाव-कोहमारा मार्गावरील घटना

Gondia: A horrific collision between a travel and a truck on the Navegaon-Kohmara route; six passengers were seriously injured
कोहमारा (गोंदिया) : भरधाव ट्रॅव्हल्सने रस्त्यालगत उभ्या ट्रकला मागेहून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात सहा प्रवासी गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी (दि.२७) सकाळी ६:३० वाजताच्या सुमारास नवेगाव-कोहमारा राज्य मार्ग क्रमांक ११ वरील चिखलीजवळ घडली.
जखमी प्रवाशांमध्ये दसाराम सुहालाल पटले (४१), दिव्यांनी मोतीराम अनंत (वय ६ महिने), अरुणा समसिंग नेता (३५), सरिता भागवत पटले (३०), फागिनीबाई टिकमसिंग भूवारिया (४५), चंद्रभान श्यामसिंग चतुर्वेदी (३४) यांचा समावेश आहे.जखमींवर सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार ट्रॅव्हल्स क्रमांक सीजी ०८ बीबी ३७२० प्रवाशांना घेऊन हैद्राबादवरून छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे वडसा राज्य मार्गाने जात होती. दरम्यान नवेगावबांध कोहमारा मार्गावरील चिखलीजवळ रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक सीजी ०८ एव्ही ८५५८ ला मागेहून ट्रॅव्हल्सने जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की ट्रॅव्हल्सचा समोरील भागाचे पुर्णपणे नुकसान झाले. यात ट्रॅव्हल्समधील सहा प्रवासी बाहेर फेकल्या गेल्याने गंभीर जखमी झाले. तर चार पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले. अपघात होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्याला सुरुवात केली. जखमी प्रवाशांना व इतर प्रवाशांना बाहेर काढण्यास मदत केली. तसेच घटनेची माहिती डुग्गीपार पोलिस स्टेशन दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.
ट्रॅव्हल्स चालकाचा अति वेग नडला
अपघाताची माहिती देताना बसमधील प्रवाशांनी ट्रॅव्हल्स चालकांने अति वेगाने ट्रॅव्हल्स चालविल्यानेच हा अपघात घडल्याचे सांगितले. तसेच हैद्राबादपासून येताना वाटेत दोनदा या ट्रॅव्हल्सचा अपघात होता होता थोडक्यात बचावला. ट्रक ओव्हरलोड नसता तर ट्रॅव्हल्स पलटी होवून मोठा अनर्थ झाला असता. ट्रॅव्हल्सचा वेग अधिक असल्याने व चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटल्यानेच हा अपघात घडल्याचे ट्रॅव्हल्समधील प्रवाशांनी सांगितले.
ट्रॅव्हल्समध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी
या ट्रॅव्हल्समध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविण्यात आले होते. दोन जणांची क्षमता असलेल्या सीटवर पाच पाच प्रवासी बसविण्यात आले होते. या ट्रॅव्हल्समध्ये किमान ८० वर प्रवासी बसविण्यात आले हाेते. ट्रॅव्हल्स ट्रकवर धडकताच काही प्रवासी सीटवरून बाजूला चेंडूसारखे फेकल्या गेले.
सणासाठी येथे मजूर परत गावी
या अपघातग्रस्त ट्रॅव्हल्समधील बहुतेक प्रवासी हे मजूर असून ते हैद्राबाद येथे रोजगारासाठी गेले होते. गणेशोत्सव व सणानिमित्त ते आपल्या गावी परतत होते. याच दरम्यान हा अपघात झाला.अपघातानंतर ट्रॅव्हल्स चालक घटनास्थळावरुन पसार झाला होता.याप्रकरणी डुग्गीपार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.