ओबीसी प्रवर्गासाठी संधींचा सोनेरी दरवाजा! महाराष्ट्र ओबीसी महामंडळाच्या विविध योजनांचा घ्या लाभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 19:21 IST2025-07-18T19:18:33+5:302025-07-18T19:21:20+5:30
Gondia : मात्र ५% गुंतवणुकीत मिळवा ५ लाखांपर्यंतचे कर्ज

Golden door of opportunities for OBC category! Various schemes of Maharashtra OBC Corporation
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्यातील ओबीसी प्रवर्गातील लोकांना स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी बहुजन कल्याण विभागांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडून २० टक्के बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना अशा विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. २० टक्के बीज भांडवल योजना ही योजना राष्ट्रीयीकृत बँक, ग्रामीण बँक तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत राबविली जाते. यामध्ये महामंडळाचा सहभाग २० टक्के, बँकेचा सहभाग ७५ टक्के व लाभार्थ्यांचा ५ टक्के सहभाग असतो. योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ५ वर्षे कालावधीच्या परतफेडीसाठी ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होते. अशा विविध योजना राबविण्यात येत आहेत.
थेट कर्ज योजना
योजनेंतर्गत शेतीला पूरक किंवा इतर छोट्या व्यवसायांकरिता कर्ज दिले जाते. यामध्ये जास्तीत जास्त १ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते. परतफेडीचा कालावधी ४ वर्षे असून, नियमित परतफेड केल्यास व्याज आकारले जात नाही.
शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना
या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरिता देशांतर्गत अभ्याक्रमासाठी प्रवेश घेण्याकरिता १० लाख रुपयांपर्यंत तसेच परदेशी अभ्याक्रमासाठी २० लाख रुपये इतके कर्ज बँकेमार्फत दिले जाते. बँकेचे कर्ज नियमित फेडल्यास महामंडळामार्फत १२ टक्के व्याज परतावा रक्कम अनुदान स्वरूपात लाभार्थीला देण्यात येते.
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
ही योजना इतर मागासवर्ग प्रवर्गातील गरीब व होतकरू महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी तसेच राज्यातील बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे उत्पादन प्रक्रिया व मूल्य आधारित उद्योगांकरिता बँकेमार्फत मंजूर करण्यात आलेल्या ५ ते १० लाख रुपयांपर्यंतच्या कर्ज रकमेवरील १२ टक्के दराने व्याज परतावा उपलब्ध करून देण्यात येतो. ही योजना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचालित साधन केंद्र (सीएमआरसी) च्या सहाय्याने जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभघेणाऱ्या महिला इतर मागास प्रवर्गातील व महाराष्ट्राच्या रहिवासी असणे आवश्यक आहे. बचत गटाची नोंदणी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचलित साधन केंद्रामध्ये केलेली असावी, अशी माहिती आहे.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना
ही योजना राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत तसेच सहकारी बँकेमार्फत राबविली जात असून, गरजू व कुशल व्यक्तींना नवीन व्यवसाय सुरू करण्याकरिता तसेच व्यवसाय वृद्धीकरिता मागणीनुसार १५ लाख रुपयांपर्यंत कर्ज बँकेमार्फत देण्यात येते. बँकेचे कर्ज नियमित फेडल्यास महामंडळामार्फत जास्तीत जास्त १२ टक्के व्याज दराने परतावा रक्कम अनुदान स्वरूपात लाभार्थीला देण्यात येते.
गृह कर्ज व्याज परतावा योजना, घ्या लाभ
ही योजना बँकेमार्फत राबविण्यात येत असून, महामंडळाच्या निकषानुसार वार्षिक उत्पन्न मर्यादेतील उमेदवारांचे बचतगट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी अशा शासन प्रणित संस्थांना बँकेतर्फे दिलेल्या कर्जावर महामंडळाकडून व्याज परतावा देण्यात येतो. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.