चार तासाच्या पावसाने शहरासह गोंदिया जिल्हा जलमय; शाळांना सुटी जाहीर, जिल्ह्यातील १७ मार्ग बंद
By अंकुश गुंडावार | Updated: July 26, 2025 13:43 IST2025-07-26T13:43:30+5:302025-07-26T13:43:56+5:30
तीन तालुक्यात अतिवृष्टीची नोंद : शहरातील वस्त्यांमध्ये साचले पाणी

Four-hour rain inundates Gondia district along with the city; Holiday declared for schools, 17 roads in the district closed
गोंदिया : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे. शनिवारी (दि.२६) पहाटे ५ ते सकाळी ९ वाजता दरम्यान झालेल्या मुसळधार पावसानेे गोंदिया शहरासह जिल्हा जलमय केला. चार तासाच्या पावसाने शहरातील रस्त्यांना तलावाचे स्वरुप आले
होते. तर आठ ते दहा वस्त्यांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची तांराबळ उडाली होती. तर गेल्या चौवीस तासात ५४.६ मिमी पाऊस झाला असून तीन तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील पुजारीटोला, कालीसरार, शिरपूरबांध धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने या धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. जिल्ह्यात काही भागात पावसाचा जोर कायम असल्याने धरणाची पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात
पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नदीकाठच्या ९५ गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने
जिल्ह्यात पुढील चोवीस तासात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पावसाचा जोर कायम असल्याने जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी शनिवारी (दि.२६) जिल्ह्यातील सर्व शाळांना सुटी जाहीर केली.
शहरातील वस्त्यांमध्ये साचले पाणी
जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. शनिवारी पहाटे ५ वाजतापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. सकाळी
९ वाजतापर्यंत पावसाचा जोर कायम होता. चार तासाच्या मुसळधार पावसाने अख्खे गोंदिया शहर जलमय झाल्याचे चित्र होते तर रस्त्यांना तलावाचे स्वरुप आले होते. शहरातील न्यू लक्ष्मीनगर, छोटा गोंदिया, सिव्हिल लाईन, सिंधी काॅलनी, परमात्मा एक नगर, सूर्याटोला, राणी अवंतीबाई चौक व गोरेलाल चौक परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. तर सखल भागातील वस्त्यांमध्ये रस्त्यावरील पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती.
मेडिकल, बीजीडीब्ल्यू रुग्णालयाच्या आवारात साचले पाणी
शनिवारी सलग चार तास झालेल्या पावसामुळे शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्याल (मेडिकल), बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांना याचा फटका बसला.
शहरवासीयांनी फोडले नगर परिषदेवर खापर
पावसाळ्यापुर्वी शहरातील नाल्यांची साफसफाई करण्यात आली नाही. तर अनेक नाल्यांवर काही जणांना अतिक्रमण केले आहे. परिणामी पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने रस्त्यावरील पाणी नागरिकांच्या घरांमध्ये साचले. त्यामुळे नुकसान झाल्याने शहरवासीयांनी नगर परिषदेवर रोष व्यक्त करीत संताप व्यक्त केला.
जिल्ह्यातील १७ मार्ग बंद काही गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला
देवरी तालुक्यातील डवकी ते शिलापूर, आवरीटोला ते गोटाबोडी, पिंडकेपार ते गोटाबोडी, मुरदोली ते आमगाव, देवरी ते बिल्लारगोंदी चिचेवाडा, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील रामपुरी ते धाबेपवणी, कवठा ते येरंडी, सिलेझरी ते एरंडी, मांडोखाल ते बोरी, महालगाव ते वडेगाव, सुरगाव ते मुंगली, बोंडगावदेवी ते बाराभाटी, आंभोरा निलज ते केशोरी खामखुरा, गणूटोला ते ककोडी, पळसगाव ते तुंबडीमेंढा, आलेवाडा,मोहगाव ते गडेगाव, कडीकसा ते कलकसा हा रस्ता बंद होता.
जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात तालुकानिहाय झाला पाऊस
तालुका पडलेला पाऊस
- गोंदिया ७५.८
- आमगाव ७४.५
- तिरोडा २२.९
- गोरेगाव ४९.३
- सालेकसा ८४.०
- देवरी ४८.९
- अर्जुनी मोरगाव ३७.४
- सडक अर्जुनी ४३.३
- एकूण ५४.६ मिमी
जिल्ह्यातील प्रमुख धरणातील पाणीसाठा
- इटियाडोह : ६८.९ टक्के
- शिरपूरबांध : ६४.२२ टक्के
- कालीसरार : ५७.२५ टक्के
- पुजारीटोला : ६१.४३ टक्के
कोणत्या धरणाचे किती दरवाजे उघडले
- पुजारीटाेला ८ दरवाजे - ८३०५ क्युसेक पाण्याचा विसर्ग
- कालीसरार ५ दरवाजे -३२५७.७५ क्युसेक पाण्याचा विसर्ग
- शिरपूरबांध ४ दरवाजे -१५२० क्युसेक पाण्याचा विसर्ग