मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये खत तस्करीवर शिक्कामोर्तब : कृषिमंत्र्यांनी फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 19:21 IST2025-07-15T19:17:47+5:302025-07-15T19:21:13+5:30
Gondia : भरारी पथके लागली युध्दपातळीवर कामाला

Fertilizer smuggling busted in Madhya Pradesh, Chhattisgarh: Agriculture Minister reprimands
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात युरियाची टंचाई निर्माण झाली होती. जिल्ह्यासाठी युरियाचा पुरवठा केला जात होता. पण, तो नेमका कुठे जातोय, असा प्रश्न निर्माण झाला होता. गोंदिया जिल्ह्यातील युरिया व इतर खतांची लगतच्या मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यांत तस्करी केली जात असल्याची ओरड होती. रविवारी (दि. १२) विभागाच्या भरारी पथकाने आमगाव येथून मध्य प्रदेशात खत वाहून नेणारे वाहन पकडले. त्यामुळे गोंदियातून मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यात युरिया व इतर खतांची तस्करी होत असल्यावर शिक्कामोर्तब झाले.
मुंबई येथे विधिमंडळाच्या पावसाळी आमदारांनी अधिवेशनादरम्यान जिल्ह्यातील युरियाची टंचाई व तस्करीचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच याची कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे तक्रार केली होती. याचीच दखल घेत कृषिमंत्र्यांनी स्वतः अधिकाऱ्यांना फोन करून याप्रकरणी त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच यात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवरसुद्धा कारवाई केली जाईल, असे फटकारताच लगेच दुसऱ्या दिवशी कृषी विभागाच्या फिरत्या पथकाने आमगाव येथून मध्य प्रदेशात खत वाहून नेणारी वाहने व युरिया खत जप्त केले. गोंदिया जिल्ह्यातून खरीप आणि रब्बी हंगामात युरियासह इतर खतांची लगतच्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यात तस्करी केली जात असल्याची बाब नवीन नाही. यासंदर्भात जि. प. कृषी विकास अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रारीसुद्धा करण्यात आल्या होत्या. या परिसरातील एक बडा डीलर यात प्रमुख भूमिका बजावत असून, त्याला संबंधित विभागाकडून अभय दिले जात असल्याची चर्चा होती. विशेष म्हणजे, युरिया खताची रॅक गोंदियात लागल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर युरियाचा साठा नव्हता. तर, काही विशिष्ट केंद्रांना युरियाचा पुरवठा करण्यात आला होता. त्यामुळे जिल्ह्यात युरिया येतोय तर मग तो जातोय कुठे, असा प्रश्न निर्माण झाला होता. 'लोकमत'नेसुद्धा हा मुद्दा लावून धरला होता. त्यानंतर कृषी विभागाच्या फिरत्या पथकाने कारवाई केली.
भरारी, फिरते पथक अॅक्टिव्ह मोडवर
कृषिमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना फटकारल्यानंतर कृषी विभागाचे भरारी व फिरते पथक अॅक्टिव्ह मोडवर आले असून, त्यांनी जिल्ह्यात धडक
तपासणी मोहीम सुरू केली आहे. तसेच जिल्ह्याच्या सीमावर्ती भागांवरसुद्धा लक्ष केंद्रित केले आहे. जिल्ह्यात खताचा काळाबाजार केला
जात असल्यास त्याची माहिती भरारी पथकाला द्यावी, असे भरारी पथकप्रमुख व जि. प. कृषी विकास अधिकारी प्रमोद कागदीमेश्राम यांनी कळविले आहे.
ब्लॉग स्पॉटमुळे कळणार शेतकऱ्यांना खताची स्थिती
जिल्ह्यातील तसेच आपल्या परिसरातील कोणत्या कृषी केंद्राकडे कोणत्या खताचा किती साठा उपलब्ध आहे. युरिया, डीएपी, एमओपी, एनपीके, एसएसपी व इतर खतांची वेळेत उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी हा ब्लॉग तयार करण्यात आलेला आहे. येथे तुम्ही आपल्या जवळच्या खत विक्रेत्याकडे खत उपलब्ध आहे की नाही, हे तपासू शकता. https://fertilizerstockgondi a.blogspot.com या संकेतस्थळावर क्लिक करून शेतकऱ्यांना खताच्या उपलब्धतेची स्थिती जाणून घेता येणार आहे.
लिंकवर क्लिक करून काय पाहाल...
- लिंकवर क्लिक करा.
- खतांची रिअल टाइम उपलब्धता तपासा.
- आपल्या गावाजवळील विक्रेते शोधा.
- उपलब्धता तालुकानिहाय पाहा.
- खताची उपलब्धता कशी तपासावी?
- आपला तालुका किंवा गावाचे नाव शोधा.
- उपलब्ध साठ्यासह दुकानदाराचे नाव तपासा.
- साठा माहिती कोण देतो ?