लहान भावाच्या हळदीच्या कार्यक्रमात नाचतांना मोठ्या भावाचा मृत्यू

By अंकुश गुंडावार | Updated: May 5, 2025 16:57 IST2025-05-05T16:55:21+5:302025-05-05T16:57:52+5:30

लग्न सोहळ्याच्या आनंदावर विरजन : सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली येथील घटना

Elder brother dies while dancing at younger brother's Haldi event | लहान भावाच्या हळदीच्या कार्यक्रमात नाचतांना मोठ्या भावाचा मृत्यू

Elder brother dies while dancing at younger brother's Haldi event

कोहमारा (गोंदिया) : लहान भावाच्या हळदी कार्यक्रमात संपूर्ण कुटुंबीय व नातेवाईक सहभागी होवून आनंद साजरा करीत होते. याच कार्यक्रमात नाचत असताना वराच्या मोठ्या भावाला भोवळ येऊन मृत्यू झाल्याने आनंदाचे क्षण दु:खात बदलले. ही घटना रविवारी (दि.४) रात्री ११:३० वाजताच्या सुमारास सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली येथे घडली. नेतराम सिताराम भोयर (४०) असे मृतक मोठ्या भावाचे आहे.

प्राप्त माहितीनुसार नेतराम भोयर यांच्या लहान भावाचे ५ मे रोजी लग्न होते. त्यामुळे भोयर यांच्या घरी रविवारी (दि.४) हळदीचा कार्यक्रम होता. हळदीच्या कार्यक्रमात संपूर्ण भोयर कुटुंबीय व्यस्त होते. साेमवारी विवाह असल्याने घरी वऱ्हाडी मंडळी सुध्दा आली होती. सर्व कुटुंबीय मिळून रात्री ११:३० वाजता हळदीच्या कार्यक्रमात नाचत होते. यात नाचत असलेले नेतराम भोयर हे अचानक भोवळ येऊन पडले. यानंतर कुटुंबीयांची धावपळ सुरु झाली. गावातील डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून नेतराम भोयर यांना मृत घोषीत केले. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. या घटनेमुळे विवाह सोहळा असलेल्या भोयर कुटुंबीयावर दुख:चे डोंगर कोसळले. नवरदेव लग्न मंडपात जाण्यापुर्वीच मोठ्या भावाचे पार्थिव स्मशानभूमीत नेण्याची वेळ विवाह असलेल्या लहान भावावर आली. या घटनेमुळे संपूर्ण गाव हळहळले. नेतराम भोयर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व दोन भाऊ, आई, वडील असा आप्त परिवार आहे.

गोबरवाही शाळेत शिक्षक म्हणून होते कार्यरत

नेतराम भोयर हे भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही येथील जि.प.शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. लहान भावाचे लग्न असल्याने ते सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली येथे कुटुंबासह आले होते. सोमवारी विवाह सोहळा असल्याने संपूर्ण भोयर कुटुंबीय आनंदात होते. मात्र नेतराम भोयर यांचा हळदीच्या कार्यक्रमात नाचताना मृत्यू झाल्याने भोयर कुटुंबीयांवर मोठा आघात झाला.

दोन मुली झाल्या पोरक्या
नेतराम भोयर यांना दोन लहान मुली आहेत. वडीलांच्या अकाली मृत्यूने दोन मुली वडीलाच्या प्रेमाला पोरक्या झाल्या आहेत. तर मोठ्यामुलाच्या मृत्यूने भोयर कुटुंबीयांचा आधारवड हरविला आहे.

Web Title: Elder brother dies while dancing at younger brother's Haldi event

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.