बाळाच्या जन्मानंतर आरसीएच नोंदणी केली का? आई व बाळाला असणार फायदा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 17:23 IST2025-01-27T17:23:03+5:302025-01-27T17:23:29+5:30
Gondia : बाळाच्या आरोग्यासाठी पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक

Did you register for RCH after the birth of your baby? It will benefit both the mother and the baby!
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ग्रामीण भागात अद्यापही गर्भवतींना पुरेशा आरोग्याच्या सोयी- सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे आरोग्य विभागाने गर्भवती आणि बाळाच्या स्वास्थ्यासाठी आरसीएच (प्रजनन आणि बाल आरोग्य) पोर्टलची संकल्पना मांडली आहे. या पोर्टलवर माता व बाल स्वास्थ्याशी संबंधित महत्त्वपूर्ण सेवा पुरविल्या जातात. बाळ होण्याची गुड न्यूज समजताच गरोदर मातेने तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क साधून आरसीएच पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
आरसीएच पोर्टमध्ये गर्भवती महिलांच्या तपासणीपासून ते नवजात बाळाच्या लसीकरणापर्यंत सर्व माहिती डिजिटल स्वरूपात नोंदविली जाते. नोंदणीनंतर महिलांना आरसीएच नंबर मिळतो. सकस आहार, आरोग्य तपासणी, प्रधानमंत्री वैद्यकीय सहायता निधी, महात्मा फुले जनआरोग्य योजना, जननी सुरक्षा योजना व इतर आरोग्य विभागाच्या योजनाचा लाभ उपलब्ध करून दिला जातो.
नोंदणी का गरजेची ?
गर्भवतींची सविस्तर आरोग्य नोंद ठेवता येते. गर्भावस्थेदरम्यान नियमित तपासणीची आठवण राहते. सरकारी योजनांचा लाभ थेट गर्भवती व नवजात बाळापर्यंत पोहोचत असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
आई व बाळाला हा होईल फायदा
सुरक्षित प्रसूतीसाठी मार्गदर्शन, बाळाच्या लसीकरणाची नोंद, बाळ, आईचे पोषण व वैद्यकीय सेवा सहज उपलब्ध होते.
आरसीएच पोर्टल काय आहे?
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने माता व बाल आरोग्य संबंधित सेवांची माहिती मिळविण्यासाठी प्रजनन व बाल आरोग्य (आरसीएच) पोर्टल सुरू केले.
आरसीएच म्हणजे गर्भवतींची हेल्थ कुंडली
आरसीएच पोर्टल ही गरोदर महिलांसाठी हेल्थ आरोग्य कुंडली आहे. त्यामध्ये गर्भवतींचे वय, वजन, रक्तदाब, हिमोग्लोबीन, तपासणीचे अहवाल आणि प्रसूतीच्या तारखेची नोंद केली जाते. या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाकडून आरोग्य विभागाच्या योजनांचा लाभ मिळणे सुलभ होते.
"माता व बाळाचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी आरसीएच पोर्टलचा वापर करणे आवश्यक आहे. या पोर्टलच्या माध्यमातून आरोग्य योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल."
- डॉ. नितीन वानखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी, गोंदिया.