अतिवृष्टीने चार हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 13:19 IST2024-09-13T13:19:15+5:302024-09-13T13:19:59+5:30
कृषी विभागाचे प्राथमिक सर्वेक्षण : पूर ओसरला, जनजीवन पूर्वपदावर, प्रशासनाने घेतला आढावा

Damage to crops in 4000 hectares due to heavy rain
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन शेकड़ो हेक्टरमधील पिके पाण्याखाली आली होती. परिणामी मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा अंदाज वर्तविला जात होता. कृषी विभागाच्या यंत्रणेने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात जिल्ह्यातील ४ हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचे पुढे आले असून या नुकसानीत पुन्हा वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
अतिवृष्टीमुळे गोंदिया, तिरोडा, सालेकसा, आमगाव, देवरी व सडक अर्जुनी तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. बुधवारपासून पावसाने विश्रांती घेतल्याने पूरबाधित गावात मदत कार्याला प्रशासनाने सुरुवात केली होती. वैनगंगा आणि बाघ नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने तिरोडा आणि गोंदिया तालुक्यात बुधवारी पूर परिस्थिती कायम होती. मात्र गुरुवारी (दि.१२) या दोन्ही तालुक्यातील पूर असून ओसरल्याने जनजीवन पूर्वपदावर आले. मात्र अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली असून पिकांचेसुद्धा नुकसान झाले आहे. पूर आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण कृषी व महसुल विभागाच्या यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यात सुरू आहे.
कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात ४ हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचे पुढे आले आहे. मात्र या आकड्यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. पिकांचे सर्वाधिक नुकसान गोंदिया, तिरोडा, सालेकसा, आमगाव, देवरी या तालुक्यात झाल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अभिजित आडसुळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
पुराने घेतला पाच जणांचा बळी
संततधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाल्याने नाल्यात वाहून गेल्याने जिल्ह्यात ठिकठिकाणी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. याची नोंद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग व पोलिस प्रशासनाने घेतली आहे.
पंचनामे युद्धपातळीवर करा
अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण युद्ध पातळीवर करून नुकसानग्रस्तांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी लोकप्रतिनिधी व नुकसानग्रस्तांकडून केली जात आहे.
१६१७ घरांची झाली पडझड
जिल्हह्यात दोन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे २६१७ घरे व ४४१ गोठ्यांची पडझड झाली आहे. पाऊस थांबताच नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याचे अनेक कुटुंबावर उघड़धावर राहण्याची वेळ आली आहे. ज्यांच्या घरांची पूर्णतः पडङरड झाली आहे त्यांना त्वरित मदत देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.