गोंदिया जिल्हा बँकेवर सहकार पॅनलचे वर्चस्व
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 14:23 IST2025-07-01T14:22:54+5:302025-07-01T14:23:46+5:30
सहकारला ११ ; परिवर्तन पॅनलला ९ जागा : दोन्ही विद्यमान आमदारांचा विजय

Cooperative Panel dominates Gondia District Bank
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महायुती समर्थित सहकार पॅनलने ११ जागांवर विजय मिळवत बँकेवर वर्चस्व स्थापन केले, तर परिवर्तन पॅनलने ९ जागा जिंकत काट्याची लढत दिली. या निकालामुळे खासदार प्रफुल्ल पटेल यांची सहकार क्षेत्रातील पकड पुन्हा अधोरेखित झाली आहे.
जिल्हा बँकेच्या एकूण २० संचालकपदासाठी ही निवडणूक झाली. या निवडणुकीत एकूण ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. माजी आ. राजेंद्र जैन आणि प्रफुल्ल अग्रवाल हे दोन संचालक अविरोध निवडून आल्याने १८ संचालकपदासाठी रविवारी (दि. २९) निवडणूक घेण्यात आली.
या निवडणुकीत एकूण ८९४ मतदारांपैकी ८६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर सोमवारी (दि. ३०) येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात मतमोजणी पार पडली. यात सहकार पॅनलचे ११, तर परिवर्तन पॅनलचे नऊ संचालक निवडून आले. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर पकड कायम ठेवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वपूर्ण मानली जात होती. या निवडणुकीत खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार परिणय फुके आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
विशेष म्हणजे या निवडणुकीत सहकार पॅनलकडून आमदार राजकुमार बडोले व विजय रहांगडाले हे दोन्ही विद्यमान आमदार विजयी झाल्याने त्यांनी या माध्यमातून आता सहकार क्षेत्रात एन्ट्री केली आहे.
...या दिग्गजांचा झाला पराभव
माजी आमदार दिलीप बन्सोड यांच्यासह बँकेचे उपाध्यक्ष राधेलाल पटले, संचालक उषा मेंढे, रेखलाल टेंभरे, राजकुमार कुथे, राजू जैन, गजानन परशुरामकर या दिग्गजांना पराभवाचा फटका बसला.