पत्ते कुटणारे चार पकडले! सरांडी जंगलात केली कारवाई, एक लाख रुपयांचा माल जप्त
By कपिल केकत | Published: January 24, 2024 06:58 PM2024-01-24T18:58:37+5:302024-01-24T19:00:06+5:30
तिरोडा पोलिस ठाण्यांतर्गत सरांडी जंगल परिसरात पत्ते कुटत असलेल्या ठिकाणी धाड घालून पोलिसांनी चार जुगाऱ्यांना रंगेहात पकडले.
गोंदिया: तिरोडा पोलिस ठाण्यांतर्गत सरांडी जंगल परिसरात पत्ते कुटत असलेल्या ठिकाणी धाड घालून पोलिसांनी चार जुगाऱ्यांना रंगेहात पकडले. तर त्यांचे दोन साथीदार मात्र पसार झाले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (दि.२०) करण्यात आली असून जुगाऱ्यांकडून एक लाख एक हजार १६० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना त्यांना सरांडी जंगल परिसरात काही जण जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली.
माहितीच्या आधारे पोलिस हवालदार इंद्रजीत बिसेन, पोलिस उपनिरीक्षक सायकर, हवालदार प्रकाश गायधने व चालक शिपा कुंभलवार यांनी घटनास्थळी धाड घातली. यात आरोपी इरशाद महमूद शेख (३६, रा. झाकीर हुसैन वॉर्ड, तिरोडा), भीमराव जिवतू वासनिक (४९, रा. सालेबर्डी, भंडारा), राजेश नत्थू भुजाडे (४६, रा. इंदिरा गांधी वॉर्ड, भंडारा), संजय विजय लिल्हारे (३६, रा. देव्हाडी, तुमसर) हे रंगेहात मिळून आले. तर त्यांचे साथीदार सुधाकर बिंझाडे (३६, रा. वडेगाव) व विक्की बागडे (२६, रा. ठाणेगाव) हे दोघे पसार झाले.
पोलिसांनी त्यांच्याकडील ४१ हजार रूपये रोख, मोटारसायकल क्रमांक एमएच ३५-एएस६८०३, मोटारसायकल क्रमांक एमए ३५-यू १२११, शंभर रूपये किंमतीची दरी, ६० रूपये किंमतीचे पत्ते असा एकूण एक लाख एक हजार १६० रूपयांचा माल जप्त केला आहे. पोलिसांनी प्रकरणी मजुका कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.