१६ वर्षाच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला तीन वर्षाचा सश्रम कारावास
By नरेश रहिले | Updated: January 31, 2025 12:52 IST2025-01-31T12:52:06+5:302025-01-31T12:52:38+5:30
जिल्हा व सत्र न्यायालयाचे निकाल: एकटी पाहून मुलीचा केला होता विनयभंग

Accused of molesting 16-year-old girl gets three years of rigorous imprisonment
नरेश रहिले
गोंदिया: दवनिवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सायटोला (मुरदाडा) येथील १६ वर्षाच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या ६० वर्षाच्या वृद्धाला जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षाचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड ठोठावला आहे. ही सुनावणी ३० जानेवारी रोजी जिल्हा व सत्र न्यायालय न्यायाधीश-३ खोसे यांनी केली आहे. या या प्रकरणात शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव हरिलाल साधू नागपुरे (६०) रा. सायटोला (मुरदाडा) असे आहे. त्याने १४ डिसेंबर २०१८ रोजी सायंकाळी ५ वाजता गावातीलच १६ वर्षाच्या मुलीला एकटी पाहून तिचा विनयभंग केला. ती मुलगी शाळेतून घरी पायी -पायी जात असताना आरोपीने तिला एकटी पाहून तिला काठीने धक्का देत तिची ओढणी ओढून तिचा विनयभंग केला.
या घटनेची तक्रार दवनीवाडा पोलिसात केल्यावर पोलिसांनी भादंविच्या कलम ३५४, ३५४ (ब) ३२३ सहकलम ८, १२ बाललैंगिक अत्याचार अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाच्या तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ यांनी केला होता. या प्रकरणावर जिल्हा सत्र न्यायालयात ३० जानेवारी रोजी सुनावणी करून आरोपीला कलम बाल लैंगिक अत्याचार अधिनियम कलम ७,८ अंतर्गत ३ वर्षाचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास ६ महिन्याच्या अतिरिक्त कारावास सुनावला आहे. या प्रकरणात फिर्यादीची बाजू सरकारी वकील कैलास खंडेलवाल यांनी न्यायालयात न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस शिपाई श्रीकांत मेश्राम यांनी काम पाहिले.