पेट्रोल टाकून सासरा, पत्नी व मुलाचा खून करणारा किशोर दोषी; दोन दिवसानंतर शिक्षेवर सुनावणी
By नरेश रहिले | Updated: May 6, 2024 19:33 IST2024-05-06T19:32:53+5:302024-05-06T19:33:49+5:30
दोन दिवसानंतर शिक्षेवर सुनावणी: बायको माहेरी गेल्याचा काढला होता राग

पेट्रोल टाकून सासरा, पत्नी व मुलाचा खून करणारा किशोर दोषी; दोन दिवसानंतर शिक्षेवर सुनावणी
गोंदिया: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याशी भांडण करून तिला मारहाण कराणाऱ्या आरोपीच्या त्रासापायी ती माहेरी आली.परंतु तिच्या माहेरी आल्यावरही आरोपी नवऱ्याने भांडण केले होते. आरोपीने रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सुर्याटोला रेल्वे चौकी येथील सासऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून सासरा, पत्नी व मुलाला जीवंत जाळले. ही घटना १४ फेब्रुवारीच्या २०२३ मध्यरात्री घडली होती. या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने क्रूर आरोपी किशोर श्रीराम शेंडे (४२) रा. भिवापूर ता. तिरोडा याला दोषी ठरविले आहे.
पहिले तदर्थ अतिरिक्त सत्र न्यायालयात आज (दि.६) जून रोजी झालेल्या सुनावणीत न्यायाधीश एन. व्ही. लवठे यांनी आरोपीला दोषी करार दिला आहे. या प्रकरणातील शिक्षेवर ९ मे रोजी सुनावणी करण्यात येणार आहे. १४ फेब्रुवारी २०२३ च्या मध्यरात्री जावयाने सासरा, पत्नी व मुलाला पेट्रोल टाकून जाळल्याची घटना घडली होती. या आगीत देवानंद सितकू मेश्राम (५२) यांचा मृत्यू झाला तर आरती किशोर शेंडे (३०) व जय किशोर शेंडे (४) हे ९० टक्के भाजल्याने त्यांना उपचारासाठी नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. उपचार घेतांना त्यांचाही मृत्यू झाला होता. या घटनेसंदर्भात रामनगर पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२, ३०७, ४३६, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील ताजने यांच्या मार्गदर्शनात रामनगर पोलिस ठाण्याच्या पथकाने तिरोडा डी. बी. पथकातील पोलिसांच्या मदतीने आरोपी किशोर शेंडे (रा. भिवापूर, ता. तिरोडा, जिल्हा गोंदिया) याला अटक केली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या नेतृत्वात पोलिस हवालदार राजेश भुरे, चव्हाण, कपिल नागपुरे, मनोज सपाटे, अख्तर शेख यांनी केली होती. या प्रकरणात सरकारची बाजू विशेष सरकारी वकील ॲड. विजय कोल्हे यांनी माडली आहे.
आरोपीविरूद्ध मिळाले ठोस पुरावे
- देवानंद सितकू मेश्राम (५२) यांना पक्षाघात असल्याने ते पडवितील खाटेवर झोपले होते. त्यांच्या अंगावर किशोरने पेट्रोल टाकले व घराच्या दरवाज्याच्या फटीमधून घरात पेट्रोल टाकला. - पेट्रोल टाकल्यानंतर किशोरने दाराची कडी वाजविली त्यावर आरती शेंडे हिने दार उघडताच आरोपी किशोने माचीसचे काडी पेटवून पेट्रोलवर टाकल्याने भडका उडाला.
- आरोपीला १६ फेब्रुवारी २०२३ ला अटक करून त्याच्या जवळून मोबाईल जप्त करण्यात आला.- पेट्राेलसाठी नेलेली १० लिटरची डबकी, आगपेटी जप्त करण्यात आली होती.
- या गुन्ह्यासाठी वापरलेली ॲक्टीव्हा मोटार सायकल एमएच ३५ झेड ९७०४ ही जप्त करण्यात आली.
- आरोपीने गुन्हा करतांना परिधान केलेले कपडे जप्त करण्यात आले.
- आरोपीने पेट्रोल श्री साई इंडीयन ऑईल पेट्रोल पंप चुरडी येथून पेंट्रोल खरेदी केल्याचे तेथील सीसीटीव्ही फुटेज मध्ये आढळला.
- उपलब्ध साक्षी, पुरावे, आरोपीकडून हस्तगत मुद्देमाल, उपलब्ध वस्तुनिष्ठ पुरावे यावरून तो दोषी असल्याचे सिध्द झाले.
दार उघडताच उगारली माचीसची काडी
आरोपी किशोर शेंडे (रा. भिवापूर) याने दारावर व घरावर पेट्रोल टाकले. पेट्रोल टाकल्यावर त्याने दार ठोठावले. यावेळी कोण आहे म्हणून दार उघडण्यासाठी आरती शेंडे गेली असता दार उघडताच त्याने पेट्रोल टाकलेल्या जागेवर माचीसची काडी टाकून जाळले. यात आरोपीचा सासरा देवानंद सितकू मेश्राम (५२), पत्नी आरती किशोर शेंडे (३०) व मुलगा जय किशोर शेंडे (४) यांचा जळून मृत्यू झाला.
आत्याच्या घरी झोपायला गेल्याने स्वरांजली वाचली
आपल्या सासऱ्यासह पत्नी व मुलाला पेट्रोल टाकून जाळणाऱ्या आरोपीचा दोष सिध्द झाला आहे. त्याची मुलगी स्वरांजली ही घटनेच्या दिवशी आपल्या आत्याकडे झोपायला गेली होती त्यामुळे ती या घटनेपासून वाचली. आरतीची आई ममता मेश्राम ह्या आपल्या निवन घराचे बांधकाम सुरू असल्याने त्या नविन घराकडे असल्यामुळे त्या बचावल्या.