गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील १३३ मत्स्यव्यवसाय संस्था बंद पडण्याच्या मार्गावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 16:05 IST2025-03-25T16:05:16+5:302025-03-25T16:05:43+5:30
परिणय फुके यांनी सभागृहाचे वेधले लक्ष : ६४ तलाव उपलब्ध करून देणार

133 fisheries institutions in Gondia and Bhandara districts on the verge of closure
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील १३३ मत्स्यव्यवसाय संस्था बंद पडण्याच्या स्थितीत असल्याने त्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊन त्यांना गावोगावी भटकावे लागत आहे. त्यामुळे मत्स्यव्यवसाय वाढविण्यासाठी शासन काही कार्यवाही आणि उपाययोजना करणार आहे का, असा प्रश्न आ. परिणय फुके यांनी सभागृहात उपस्थित केला. यावर उत्तर देताना मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी ६४ तलाव मत्स्यव्यवसायासाठी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती दिली.
आ. डॉ. परिणय फुके यांनी सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायावर अवलंबून असलेल्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाबाबत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील १३३ मत्स्यव्यवसाय संस्था बंद पडण्याच्या स्थितीत असल्याने या मत्स्यव्यवसायावर अवलंबून असलेल्या लाखो कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊन त्यांना रोजगारासाठी गावोगावी भटकावे लागत असल्याची बाब डिसेंबर २०२४ मध्ये निदर्शनास आली. हा प्रश्न डॉ. फुके यांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सविस्तर उत्तर दिले. मत्स्यव्यवसाय विभागाकडील ६४ तलाव ३ जुलै २०१९ च्या शासन निर्णयानुसार मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना मासेमारीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. १४४ तलाव सहकारी संस्थेस प्राधान्याने मासेमारीसाठी ठेक्याने देण्यात आले असल्याचे सांगितले.
९ संस्थांना साहित्य पुरवठा
गोंदिया व भंडारा जिल्ह्यात बांध पद्धतीद्वारे पावसाळ्यात मत्स्यप्रजनन करून मत्स्यबीज निर्मिती करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन दिले जाते आहे. त्यासाठी वर्ष २०२२-२३ मध्ये बांध प्रजननासाठी उपयोगी असणाऱ्या साहित्याचा पुरवठा ९ संस्थांना मानव विकास कार्यक्रमांतर्गत ८.९७ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला होता, अशीही माहिती राणे यांनी सभागृहात दिली.
२१ लाख रुपयांची तरतूद
जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना मासेमारीसाठी आवश्यक असणारे मासेमारी जाळे आणि नौका अनुदानावर खरेदीसाठी मासेमारी साधनांच्या खरेदीवर अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत ५० टक्के अनुदानाने स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यासाठी २०२४-२५ या आर्थिक वर्षात सर्वसाधारण योजनेअंतर्गत २१ लाख रुपयांची तरतूद जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अर्थसंकल्पित असून त्याचा लाभ गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील मच्छीमारांना होणार आहे, असे सांगितले.