आर्थिक पॅकेज न देणे, हा अन्याय; खोट्या आश्वासनांनी गोमंतकीय त्रस्त: विजय सरदेसाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 07:28 IST2026-02-02T07:26:39+5:302026-02-02T07:28:14+5:30
राज्याला अपेक्षित विशेष आर्थिक पॅकेज दिले नाही.

आर्थिक पॅकेज न देणे, हा अन्याय; खोट्या आश्वासनांनी गोमंतकीय त्रस्त: विजय सरदेसाई
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: केंद्रीय अर्थसंकल्पावर गोवा फॉरवर्डने टीका करताना गोमंतकीयांचा अपेक्षाभंग झाल्याचे सांगितले आहे. पक्षाचे प्रमुख तथा आमदार विजय सरदेसाई यांनी म्हटले की, गोव्याने केलेल्या सर्व मागण्यांकडे केंद्राने दुर्लक्ष केल्याने राज्याची दिल्लीतील उपेक्षा उघड झाली आहे. राज्याला अपेक्षित विशेष आर्थिक पॅकेज दिले नाही.
सरदेसाई म्हणाले, की दि. १० जानेवारी रोजी राज्य सरकारने केंद्रीय अर्थसंकल्पात विविध विकासात्मक प्रकल्पांसाठी विशेष आर्थिक पॅकेजची मागणी केली होती. मात्र, या मागण्यांचा अर्थसंकल्पात समावेश केलेला नाही. त्यामुळे गोव्यावर अन्याय झाला आहे. नवीकरणीय ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने १०० कोटींचे विशेष पॅकेज मागितले होते, पण केंद्राने ते दिले नाही. नव्या कुशावती जिल्ह्यासाठी ५०० कोटींचे पॅकेज मागितले होते, त्याकडेही दुर्लक्ष केले गेले. राष्ट्रीय महामार्गाशी जोडलेल्या औद्योगिक कॉरिडॉरसाठी १ हजार कोटी रुपये मागितले होते, तरीही ते मंजूर केलेले नाहीत.
सरदेसाई म्हणाले, की मडगाव येथे नवीन रेल्वेस्थानकाच्या विकासासाठी १६० कोटी रुपये मागितले होते, त्याकडे लक्ष दिले गेले नाही. किनाऱ्याची धूप रोखण्यासाठी राज्य सरकारने मागितलेल्या ६०० कोटी रुपयांच्या पॅकेजकडेदेखील केंद्राने दिले नाही.
महिलांचा सन्मान, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षाचा खरा चेहरा समोर आला आहे. त्यामुळे जनतेला आता जागृत व्हावे, असे गोवा फॉरवर्डचे नेते तथा आमदार आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले. फातोर्डा येथील एका कार्यक्रमात सरदेसाई हे लोकांना संबोधत होते.
सरकारकडून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असताना आणि पाण्यासाठी नागरिक वणवण फिरत असताना, सरकार केवळ गॅरंटीच्या बाता मारत आहे. राज्यातील नोकऱ्या विक्रीवरून सरकारला धारेवर धरत भाजपचे एजंट सरकारी नोकऱ्यांचा लिलाव करत असल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला. भ्रष्ट कारभारामुळे तरुण हताश होऊन आता पोर्तुगीज पासपोर्ट घेऊन परदेशात स्थलांतर करत आहेत. केवळ ख्रिश्चन समाजच नाही तर आता हिंदू समाजही नोकऱ्यांअभावी गोवा सोडून जात आहे, असा दावा सरदेसाईंनी केला.
मोफत सिलिंडर गेले कुठे?
गेल्या निवडणुकीत भाजपने दिलेले तीन मोफत गॅस सिलिंडरचे आश्वासन हवेत विरले आहे. याशिवाय, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आणि ४५ रुपयांना डॉलर मिळवून देण्याचे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारने जनतेची फसवणूक केली आहे, असा आरोप सरदेसाई यांनी केला.
