मतदान करुन तृतीयपंथींनी केला आनंद व्यक्त, नागरिकांना मतदान करण्याचं केलं आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2024 14:58 IST2024-05-07T14:57:11+5:302024-05-07T14:58:18+5:30
गोव्यात तृतीयपंथींनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

मतदान करुन तृतीयपंथींनी केला आनंद व्यक्त, नागरिकांना मतदान करण्याचं केलं आवाहन
नारायण गावस, पणजी: आज मतदान करुन खरोखरच आनंद हाेत आहे. संविधानाने आम्हाला मतदानाचा हक्क देते समाजात आम्ही बराेबर असल्याचे स्थान दिले आहे. लाेकांनी मतदान हा दिवाळी, हाेळी सारखा उत्सव समजून साजरा करावा. देशाच्या विकासासाठी सर्वांनी पुढे येऊन मतदार करावे, असे आवाहन तृतीयपंथी गटाचे मतदार मधू गुप्ता यांनी उत्तर गोव्यातील सांताक्रुज मतदारसंघात मतदान करताना सांगितले.
मधु गुप्ता म्हणाल्या राज्यभरात आमच्या गटातील एकूण ९ तृतीयपंथीय लोकांना मतदान करण्याचा अधिकार मिळाला आहे. पूर्वी आम्हा तृतीयपंथी लोकांना समाजात चांगला मान सन्मान मिळत नव्हता. पण आता मतदानासारखा अधिकार मिळाल्याने आम्हाला समाजात इतर लोकांप्रमाणे मान सन्मान मिळत आहे. आज देशाच्या विकासासाठी मतदान करायला मिळत आहे याचा आनंद वाटत आहे. त्यामुळे लोकांनी यावेळी पुढे सरुन मतदान करावे. तुमचे एकमत देशाच्या भवितव्यात महत्वाचा वाटा ठरणार आहे.. त्यामुळे कुणीही कसलेही काम असो सर्व बाजूला ठेऊन मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.
मधु गुप्ता म्हणाल्या आम्ही मतदानासाठी बुथवर गेलो तेव्हा आम्हाला कुठेच असा वेगळेपणा वाटला नाही, इतर मतदारांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला. तसेच जे निवडून आले होते त्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केले, सर्व सुविधा व्यवस्थित होत्या. त्यामुळे मतदान करताना आम्हाला कुठेच त्रास झाला नाही.