उत्पल पर्रीकर-काँग्रेस यांच्यात चर्चा; पणजी मनपासाठी 'वेगळ्या फॉर्म्युला'वर काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 11:25 IST2026-02-04T11:25:00+5:302026-02-04T11:25:00+5:30
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

उत्पल पर्रीकर-काँग्रेस यांच्यात चर्चा; पणजी मनपासाठी 'वेगळ्या फॉर्म्युला'वर काम
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भाजपसह पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करणारे उत्पल पर्रीकर यांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपला किंबहुना बाबूश यांना धक्का देण्यासाठी उत्पल पर्रीकर आणि काँग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत पाटकर म्हणाले की, महापालिका निवडणुकीबाबत उत्पल पर्रीकर यांच्याशी यापूर्वी एकदा चर्चा झाली आहे. येत्या काही दिवसांत पुन्हा चर्चा होणार आहे. या चर्चेचा अंतिम निष्कर्ष काय असेल, हे आत्ताच सांगणे शक्य नाही.
मात्र, काँग्रेस या निवडणुकीसाठी वेगळ्या फॉर्म्युलावर काम करत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. भाजपविरोधातील पर्रीकर यांच्या भूमिकेमुळे काँग्रेसने यापूर्वीच त्यांना पाठिंबा दर्शवला होता.
पालिकांसाठीही तयारी
काँग्रेसचे लक्ष केवळ पणजी महापालिका निवडणुकीपुरते मर्यादित नसून, राज्यातील इतर पालिकांच्या निवडणुकांवरही आहे. आगामी महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेसची तयारी सुरू आहे. प्रत्येक शहरासाठी स्वतंत्र रणनीती आखली जात आहे. काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या मैदानात उतरणार असून, त्याचे सकारात्मक परिणाम आगामी काळात दिसून येतील, असा विश्वासही पाटकर यांनी व्यक्त केला.