तीन वर्षांत वगळले तब्बल ३२,९९० मतदार; मृत, स्थलांतरितांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 13:04 IST2025-03-31T13:04:37+5:302025-03-31T13:04:37+5:30
१ जानेवारी २०२२पासून आजपावेतो वेळोवेळी सुधारित मतदायाद्या तयार करण्यात आल्या.

तीन वर्षांत वगळले तब्बल ३२,९९० मतदार; मृत, स्थलांतरितांचा समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गेल्या तीन वर्षांच्या काळात उत्तर गोव्यात मतदार याद्यांमधून वेगवेगळ्या कारणास्तव तब्बल ३२,९९० नावे वगळण्यात आल्याची अधिकृत माहिती प्राप्त झाली आहे. मतदाराचा मृत्यू झालेला असल्यास तसेच कायमस्वरूपी स्थलांतर, पत्त्यावर न सापडणे, दोन ठिकाणी नोंदणी केलेली असेल किंवा भारतीय नागरिकत्व सोडून अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारलेले असेल तर अशा कारणांसाठीच ही नावे मतदारयाद्यांमधून काढून टाकली आहेत.
१ जानेवारी २०२२पासून आजपावेतो वेळोवेळी सुधारित मतदायाद्या तयार करण्यात आल्या. बीएलओ घरोघर भेट देऊन माहिती घेत असतात. त्या माहितीच्या आधारावरच ही नावे वगळण्यात आली आहेत. काहींनी कायमस्वरुपी स्थलांतर केलेले आहे किंवा इतर देशांचे नागरिकत्व स्वीकारले आहे. त्यांनी स्वतः नावे रद्द करून घेतली.
मृत व्यक्तीबाबत त्याचे किंवा तिचे नातेवाइक संबंधित ईआरओ कार्यालयात फॉर्म ७ भरून देऊ शकतात किंवा मतदार हेल्पलाइन अॅप इत्यादीद्वारे ऑनलाइन पद्धतीने नाव वगळण्यासाठी अर्ज सादर शकतात, जेणेकरून मृत मतदाराचे नाव मतदारयादीतून काढता येईल. कायमचे स्थलांतरीत झालेल्या मतदाराचे नाव वगळण्यासाठी त्या मतदारसंघातील कोणताही मतदार ईआरओ कार्यालयात फॉर्म ७ भरून आक्षेप दाखल करू शकतो. मृत व्यक्तीबाबत ईआरओ कार्यालय चेकलिस्ट तयार करते आणि संबंधित भागाच्या बीएलओकडे फील्ड पडताळणीसाठी पाठवते. बीएलओचा अनुकूल अहवाल मिळाल्यानंतर मृत मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले जाते.
...अशी आहे प्रक्रिया
स्थलांतर केलेल्या कुटुंबांबाबतही चेकलिस्ट तयार केली जाते आणि ती फील्ड व्हेरिफिकेशनसाठी बीएलओकडे सादर केली जाते. बीएलओचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आक्षेप घेणाऱ्याला आणि ज्या व्यक्तीचे नाव वगळण्याची मागणी आहे, त्यांना सुनावणीसाठी फॉर्म १३ आणि १४मध्ये नोटीस दिली जाते. संबंधित पक्षांचे म्हणणे ऐकल्यानंतर कायमचे स्थलांतरित झालेल्या व्यक्तीचे नाव मतदारयादीतून वगळले जाते.