Lok Sabha Election 2019; The average of 45.05 percent polling for those 'four centers' | Lok Sabha Election 2019; ‘त्या’ चार केंद्रांवर सरासरी ४५.०५ टक्के मतदान

Lok Sabha Election 2019; ‘त्या’ चार केंद्रांवर सरासरी ४५.०५ टक्के मतदान

ठळक मुद्देगट्टात मतदान केंद्र : वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मतदान केंद्रावर ठिय्या; चोख सुरक्षेत पार पडले मतदान

लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : तालुक्यातील वटेली, गर्देवाडा, पुस्कोटी, वांगेपल्ली गावांचे गट्टा येथे १५ एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले. या चारही मतदान केंद्रांवर सरासरी ४५.०५ टक्के मतदान झाले.
११ एप्रिल रोजी या मतदान केंद्रांवर पोलिंग पार्ट्या पोहोचल्या नव्हत्या. त्यामुळे त्या गावांमध्ये १५ एप्रिल रोजी मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला. वटेली येथे एकूण ९३३ मतदार आहेत. त्यापैकी ४९४ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ५२.९५ टक्के एवढी आहे. गर्देवाडा मतदान केंद्रांतर्गत एकूण ६४५ मतदार आहेत. त्यापैकी २८० मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ४३.१ एवढी आहे. पुस्कोटीत एकूण ४३७ मतदार आहेत. त्यापैकी १८८ मतदारांनी मतदान केले. मतदानाची आकडेवारी ४३.०२ एवढी आहे. वांगेतुरी येथे एकूण ६७१ मतदार आहेत. त्यापैकी २४८ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ३६.९६ टक्के एवढी आहे. नागरिकांनी मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकावा, असे आवाहन नक्षलवाद्यांनी गट्टा भागात केले होते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वांगेपल्ली, पुस्कोटी, वटेली व गर्देवाडा या चार बुथावरील मतदान प्रक्रिया सोमवारी गट्टा पोलीस स्टेशन परिसरात घेण्यात आली. गोटूल भवनात दोन तर एका घरी दोन मतदान केंद्र ठेवण्यात आले होते. सदर चारही बुथाचे मिळून १६ गावातील मतदारांसाठी गट्टा येथे केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती.
१६ गावाची मिळून एकूण २ हजार ६८६ मतदार होते. यापैकी २ हजार १०४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आज झालेल्या निवडणुकीत मतदार ५ ते २५ किमी अंतरावरून गट्टा येथे मिळेल त्या साधनाने पोहोचले. काही मतदार ट्रॅक्टर, दुचाकी, सायकलद्वारे गट्टा येथे पाहोचले. तर काहींनी पायी येऊन मतदान केले. यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या ठिकाणी उपविभागीय अधिकारी कैलास अंडील, अहेरी प्राणहिता उपमुख्यालयाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय बंसल व हेडरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शशिकांत भोसले लक्ष ठेवून होते.
५ लाख ५७ हजार महिलांचे मतदान
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात एकूण १५ लाख ८० हजार ७० मतदार आहेत. यामध्ये पुरूष मतदारांची संख्या ७ लाख ९९ हजार ७४७ तर महिला मतदारांची संख्या ७ लाख ८० हजार ३२० एवढी आहे. त्यापैकी ५ लाख ८० हजार २९० पुरूषांनी तर ५ लाख ५७ हजार ५ महिलांनी मतदान केले आहे. पुरूषांच्या मतदानाचे प्रमाण ७२.५६ टक्के तर महिलांच्या मतदानाचे प्रमाण ७१.३८ टक्के एवढे आहे. महिला व पुरूषांचे मतदान मिळून सरासरी ७१.९८ टक्के मतदान झाले आहे.
यापूर्वी ७२.०२ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक विभागाने कळविले होते. मात्र त्यामध्ये १५ एप्रिल रोजी पार पडलेल्या मतदार व मतदानांची आकडेवारी समाविष्ट नव्हती. १५ एप्रिल रोजी मतदान पार पडल्यानंतर लोकसभा क्षेत्राची अंतिम मतदानाची टक्केवारी काढण्यात आली. त्यामध्ये अंतिम टक्केवारी ७१.९८ टक्के एवढी आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019; The average of 45.05 percent polling for those 'four centers'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.