थरार! बिबट्याचा धावत्या पेपर गाडीवर हल्ला, चालक थोडक्यात बचावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2022 18:17 IST2022-05-17T15:07:21+5:302022-05-17T18:17:48+5:30
कुरखेडा- वडसा मार्गावर कसारीचा जंगलात बिबट्याने धावत्या वाहनावर हल्ला केला. यावेळी प्रसंगावधान राखत चालकाने वाहन नियंत्रित ठेवल्याने मोठा अपघात टळला.

थरार! बिबट्याचा धावत्या पेपर गाडीवर हल्ला, चालक थोडक्यात बचावला
कुरखेडा (गडचिरोली) : धावत्या चारचाकी वाहनावर बिबट्याने उडी मारून केलेल्या हल्ल्यात वाहन चालकाच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. ही घटना मंगळवारी कुरखेडा-वडसा मार्गावर सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली. यावेळी प्रसंगावधान राखत चालकाने वाहन नियंत्रित ठेवल्याने मोठा अपघात टळला.
नागपूरवरून कोरचीकडे दैनिक वर्तमानपत्रांच्या पार्सल पोहचवून देण्याच्या सेवेत असलेले विदर्भ डेली न्यूज पेपर एजेंसीचे चारचाकी वाहन मंगळवारी पहाटे नागपूरवरून कोरची येथे पेपर पार्सल पोहोचवून परत नागपूरकडे जात होते. दरम्यान कुरखेडा- वडसा मार्गावर कसारीचा जंगलात बिबट्याने धावत्या वाहनाच्या समोरील दारावर उडी घेतली. त्यामुळे चालक प्रकाश बोबडे (४५, रा. नागपूर) यांचा उजवा हात बिबट्याचा पंज्यात सापडला.
या झटापटीत त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. या बिकट परिस्थीतीतही त्यांनी प्रसंगावधान राखत वाहन नियंत्रित ठेवले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. यानंतर एकाच हाताने वाहन चालवत त्यांनी विसोरा हे गाव गाठत तिथे प्राथमिक उपचार केला व नागपूरकडे रवाना झाले. यापूर्वी परीसरात वाघ, बिबट व अन्य हिंस्त्र प्राण्यांकडून हल्ल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. मात्र धावत्या चारचाकी वाहनावर हल्ला होण्याची ही कदाचित पहीलीच घटना असावी.