Ganesh Naik's cut ticket from Belapur for assembly election 2019 | गणेश नाईक यांचा बेलापूरमधून पत्ता कापला, आता हाच पर्याय उरला ?

गणेश नाईक यांचा बेलापूरमधून पत्ता कापला, आता हाच पर्याय उरला ?

अजित मांडके

ठाणे : भाजपमध्ये ५५ नगरसेवकांची कुमक घेऊन दाखल झालेल्या गणेश नाईक यांच्या उमेदवारीची पहिल्या यादीत घोषणा झालेली नाही. एकाच घरातील दोघांना उमेदवारी देण्याची भाजपमध्ये पद्धत नाही, अशा चर्चा ठाणे जिल्ह्यात सोशल मीडियावर सुरु असल्याने भाजप व शिवसेनेतील बड्या नेत्यांनी गणेश नाईक यांचे प्रस्थ वाढू नये याकरिता खेळी केल्याची चर्चा सुरु झाली आहे. नाईक यांच्या प्रवेशामुळे ठाण्यातील शिवसेनेचे नेते तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये यापूर्वी आलेले नेते आणि भाजपमधील जुनेजाणते अस्वस्थ होते.

ठाणे शहर मतदारसंघ शिवसेना आपल्याकडे घेणार या चर्चेला संजय केळकर यांच्या उमेदवारीमुळे पूर्णविराम मिळाला आहे. मात्र या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याकरिता इच्छुक असलेल्या नरेश म्हस्के यांच्या स्वप्नावर बोळा फिरला आहे. कल्याण पश्चिममध्ये नरेंद्र पवार यांना भाजपच्या अंतर्गत राजकारणाचा व ठाणे जिल्ह्यातील शिवसेना-भाजप नेत्यांच्या अंडरस्टँडींगचा धक्का बसल्याची चर्चा आहे.
काही दिवसांपूर्वी नाईक यांनी भाजपचे कमळ हाती घेतले होते. त्यानंतर ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघातून अनुक्रमे संदीप नाईक आणि गणेश नाईक यांना उमेदवारी दिली जाईल, असे बोलले जात होते. बेलापुरच्या विद्यमान आ. मंदा म्हात्रे यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा मधल्या काळात जोर धरू लागली होती. परंतु भाजप आणि शिवसेनेतील काही नेत्यांना नाईक निवडून आले आणि त्यांच्या खांद्यावर जिल्हा नेतृत्वाची किंवा पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाण्याची भीती वाटत होती. त्यामुळे काही दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात नाईकांना गडकरी रंगायतन येथे झालेल्या कार्यक्रमापासून लांब ठेवले होते. येथूनच नाईकांच्या विरोधात भाजपमधील काही प्रस्थापित मंडळी सक्रिय झाल्याचे दिसून आले. भाजपच्या पहिल्या यादीत बेलापूर मतदारसंघातून पुन्हा मंदा म्हात्रे यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. आता नाईकांना त्यांच्या कट्टर विरोधक म्हात्रे यांचा प्रचार करावा लागणार आहे. एकाच घराण्यातील दोनजणांना तिकीट देता येत नाही, असे कारण भाजपकडून नाईक यांना उमेदवारी नाकारताना दिल्याची चर्चा आहे.

ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ठाणे शहर भाजपने सोडला नसल्याने म्हस्के यांच्या स्वप्नांवर बोळा फिरला. म्हस्के यांचे नेतृत्व मोठे झाले तर डोकेदुखी वाढण्याची भीती हेच हा मतदारसंघ शिवसेनेकडे खेचून न घेण्याचे कारण असू शकेल, असे बोलले जाते. त्यामुळे म्हस्के यांची वाटचाल गोपाळ लांडगे यांच्या मार्गाने होणार, अशी कुजबुज शिवसेना वर्तुळात ऐकायला मिळत आहे.
ठाणे शहर ऐवजी शिवसेनेने कल्याण पश्चिम मतदारसंघ आपल्याकडे घेतला आहे. पहिल्या यादीत नाव जाहीर न झालेले मंत्री विनोद तावडे यांचे नरेंद्र पवार यांच्याशी घनिष्ट संबंध असल्याने भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने पवार यांचे तिकीट कापून अप्रत्यक्षपणे तावडे यांना शह दिल्याचे बोलले जात आहे. कल्याण पश्चिममधून प्रकाश पाटील यांचे नाव शिवसेनेकडून जवळपास निश्चित झाले आहे. मात्र ते भिवंडीतील असल्याने त्यांच्या नावाला शिवसेनेच्या काही मंडळींनी विरोध केला आहे. या मतदारसंघातून ११ जण इच्छुक आहेत. मात्र पाटील हे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असल्यानेच त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, असे स्पष्ट संकेत आहेत. कल्याण पश्चिम हा मतदारसंघ शिवसेनेकडे आल्याने भविष्यात कल्याण लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खा. श्रीकांत शिंदे यांचे स्थान मजबूत होणार आहे.

नाईक यांच्यापुढे पर्याय कोणते?
गणेश नाईक यांच्यासारख्या मातब्बर नेत्याला बेलापूरमधील उमेदवारी दिली नसली तरी ठाणे जिल्ह्यातील कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून त्यांची इच्छा असल्यास उमेदवारी दिली जाऊ शकते. याखेरीज नाईक यांना विधान परिषदेवर संधी दिली जाऊ शकते.
 

Web Title: Ganesh Naik's cut ticket from Belapur for assembly election 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.