पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात; आता नगरपंचायतीतही प्रशासकराज
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 15:11 IST2024-08-14T15:09:39+5:302024-08-14T15:11:08+5:30
९ ठिकाणी तहसीलदारांची नियुक्ती: जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Expiration of two and a half year term of office bearers; Now Administrator Raj in Nagar Panchayat too
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील तीन नगरपालिकांमध्ये सुमारे तीन वर्षांपासून प्रशासकराज आहे. उर्वरित ९ नगरपंचायतीतील पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने तहसीलदारांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. १२ ऑगस्टला जिल्हाधिकारी संजय दैने यांनी हे आदेश काढले.
जिल्ह्यात गडचिरोली, आरमोरी व देसाईगंज येथे नगरपालिका असून कोरची, कुरखेडा, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा, अहेरी, सिरोंचा, एटापल्ली व भामरागड येथे नगरपंचायत आहे. नगरपालिकेतील शेवटची पंचवार्षिक निवडणूक २०१७ मध्ये झाली होती.
पाच वर्षांचा कालावधी उलटून तीन वर्षे झाल्यानंतरही आरक्षणावरून निर्माण झालेल्या गुंत्यामुळे निवडणुका झालेल्या नाहीत. तथापि, जिल्ह्यातील ९ नगरपंचायतींमधील सार्वत्रिक निवडणूक २० जानेवारी २०२२ रोजी पार पडली होती. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती यांची अडीच वर्षासाठी निवड झाली होती. ही प्रकिया काही ठिकाणी १४ फेब्रुवारी २०२२ तर काही ठिकाणी १५ फेब्रुवारी २०२२ रोजी पार पडली होती. या पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ १४ व १५ ऑगस्ट २०२४ रोजी रोजी पूर्ण होत आहे. नवीन अध्यक्षांची निवड होईपर्यंत त्या-त्या तालुक्यांचे तहसीलदार हे आता नगरपंचायतीचे प्रशासक म्हणून काम पाहणार आहेत.
नगराध्यक्षपदाची सोडत न झाल्याने प्रशासक
नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांचा अडीच वर्षांचा कालावधी संपुष्टात आला आहे. तेथे नगराध्यक्षपदाची सोडत अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५चे कलम ६० नुसार प्रशासकांची नियुक्ती केली आहे.
ध्वजारोहण करण्याची संधी हुकली
यंदा स्वातंत्र्य दिनाचा ७७वा वर्धापन दिन गुरुवारी आहे. काही नगरपंचायतीत पूर्वसंध्येला तर काही ठिकाणी त्याच दिवशी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींचा अडीच वर्षांचा कालावधी संपत आहे. त्यामुळे ध्वजारोहण करण्याची पदाधिकाऱ्यांची संधी हुकली आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांचा हिरमोड झाला आहे.