'दोन पैशांची दारू पिऊन अमूल्य मत पाच वर्षे दावणीला बांधू नका'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 15:36 IST2024-11-07T15:34:22+5:302024-11-07T15:36:13+5:30
मुक्तिपथ- शक्ती पथतर्फे जागृती : गावागावांत लागले फलक

'Don't bind your precious vote for five years by drinking two-rupees liquor'
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा क्षेत्रात होऊ घातलेली निवडणूक ही दारूमुक्त व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या स्वीप कार्यक्रमांतर्गत मुक्तिपथ-शक्तिपथ संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. जिल्हाभरात शहरी, तसेच ग्रामीण भागात बॅनर व पत्रकांच्या माध्यमातून ही विधानसभा निवडणूक दारूमुक्त करण्याचे आवाहन केले जात आहे.
मागील ३१ वर्षांपासून जिल्ह्यात दारूबंदी आहे. ही दारूबंदी कायमस्वरूपी टिकून आहे. 'जो पाजील माझ्या नवऱ्याला दारू त्या उमेदवाराला नक्कीच पाडू', 'दोन पैशांची दारू घेऊन आपले अमूल्य मत देऊ नका', 'ज्याला दारूबंदी नको, तो उमेदवार आम्हाला नको', असा आशय लिहिलेल्या बॅनरद्वारे मतदार जागृती करून ही निवडणूक दारूमुक्त करण्याबाबत लोकांना आवाहन केले जात आहे.
तसेच निवडणुकीसाठी उभा राहणारा उमेदवार गाव व जिल्हा दारूबंदीचा समर्थन करणारा असावा. आमचे मत हवे असल्यास दारूबंदी समर्थनाचे लिखित वचन निवडणुकीत उभे असणाऱ्या उमेदवाराने आम्हाला द्यावे लागेल. वचन न देणाऱ्या नेत्याला, उमेदवाराला आम्ही मत देणार नाही. स्वतः दारू पिणारा नसावा, असे सांगितले जात आहे.
१५,२२३ लोकांचा स्वाक्षरी मोहिमेत सहभाग
निवडणुकीत उमेदवारांकडून दारूचे वाटप होऊ नये यासाठी मुक्तिपथ- शक्तिपथ गाव संघटनेच्या माध्यमातून गावागावांमध्ये ठराव घेऊन आपला उमेदवार कसा असावा, मतदारांचे कर्तव्य आदी बाबी पटवून दिल्या जात आहेत. जिल्हाभरातून २७२ गावांमध्ये ठराव पारित करण्यात आले असून, एकूण १५ हजार २२३ लोकांनी स्वाक्षरी करीत दारूमुक्त निवडणूक पार पाडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विविध ठिकाणी बॅनर लावून जागृती सुरु आहे.