खाद्ययात्रा: मोदक... पाककलेतील एक शिवधनुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 12:37 IST2025-08-24T12:35:53+5:302025-08-24T12:37:28+5:30
Ganesh Mahotsav: मोदक आणि त्यातही उकडीचे मोदक हे दोन मिनिटांत होणारे काम नाही. कापले, चिरले, फोडणीत टाकले असे नसतं.

खाद्ययात्रा: मोदक... पाककलेतील एक शिवधनुष्य
-शुभा प्रभू-साटम
मोदक आणि त्यातही उकडीचे मोदक हे दोन मिनिटांत होणारे काम नाही. कापले, चिरले, फोडणीत टाकले असे नसतं. चतुर्थी कधी आहे त्या अंदाजाने चिकट तांदूळ धुऊन, फक्त सावलीत वळवावे लागतात. मग ते फक्त तांदुळच दळायला द्यावे लागतात. निव्वळ पांढरे खोबरे किसून खोवून गुळासोबत सोनेरी होईपर्यंत शिजवावे लागते. मग उकड काढून मळून मोदकाच्या मुखऱ्या पडून सारण भरून, केळी अथवा हळदीच्या पानावर उकडून घ्यायचे असतात. असे शुभ्रधवल मोदक मग बाप्पाला दाखवून नंतर स्वतः गट्टम करायचे असतात.
पुन्हा मोदक खाण्याचे एक शास्त्र असते. उचलला की घेतला चावा असे नाही. तो अलगत फोडायचा... वसकन दोन तुकडे नाही तर, हळूच नाजूकपणे. त्यावर मग तुपाची धार... तुपामुळे मोदक अधिक तुकतुकीत दिसतो आणि घशात अलगद उतरतो. आता खाणे इतक्या नजाकतीने असेल तर करायला काय कसोटी लागत असेल?
मुळात हा प्रकार शोधला कसा? कारण उत्तम मोदक करता- बांधता येणे हे येऱ्या-गबाळ्याचे काम नव्हे. त्याही आधी उकड जमणे हे पण तितकेच महत्त्वाचे. पूर्वी चतुर्थी आधी खूप धांदल व्हायची. सध्या आयती पिठी मिळते. मग त्यातील सारण. शुभ्र पांढऱ्या खोबऱ्यात एकजीव झालेला सोनेरी गुळ आणि चवीला चार चांद लावणारी खसखस वेलदोडे. बोटांनी पातळ पारी करायची, मुखऱ्या काढायच्या. सारण भरून, तोंड बंद करून मोदक महाराजांना स्टीम बाथ द्यायचा. पुढील सर्व माहीत आहेच.
कोणे एकेकाळी फक्त गणेश चतुर्थी आणि अंगारकीवेळी होणारा अस्सल घरगुती मोदक आज तुफान लोकप्रिय झालाय. इतका की तो वेगाने डिसर्ट म्हणून खपतो आहे... एकदम विदेशी मेजवानीत. हिरव्यागार केळीच्या पानावर विसावलेले, छोटे मोदक बघून माझा मराठी आत्मा कमाल अचंबित झाला होता. देवापुढे दाखवल्या जाणाऱ्या नैवेद्याचा हा अवतार वेगळाच. पण मराठी सोडाच, अमराठी खवय्यांत उकडीचे मोदक जबरदस्त लोकप्रिय आहेत.
उकडीच्या मोदकांची मिजास मुख्यत्वे कोकणात. महाराष्ट्रात अन्य बऱ्याच ठिकाणी तळणीचे मोदक केले जातात. कणिक आणि पुरण यांचे अथवा नेहमीचे सारण. आकार छोटा आणि जसे पोळी की चपाती यावर हिरीरीने भांडणारे लोक आहेत तसेच मोदक म्हणताना फक्त तळणीचा असा पुरस्कार करणारे पण आहेत.
आज मात्र थोडा वेगळा ट्रेंड दिसतो. म्हणजे उकडीचे पण वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे मोदक दिसू लागलेत. पान, गुलकंद, रोज, स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट चवीचे मोदक. मी तशी उदारमतवादी असले तरी या बाबतीत कट्टर रुढीवादी आहे. ‘मोदक को मोदक रहेने दो, कोई नाम ना दो..’ असे मत आहे. सत्यानाश करायला अनेक पदार्थ आहेत,मोदक सोडा गडे हो.
सुरेख सजवलेली मूर्ती, टपोरी जास्वंद, पिवळा धम्मक केवडा, हिरवीगार पत्री, मंद तेवणारी निरंजन, समया, उदबत्तीचा दरवळ, आरतीचा घोष आणि नैवेद्यासाठी, केळीच्या पानावर विराजमान होऊन येणारे पांढरे शुभ्र मोदक. नास्तिक असा अथवा श्रद्धाळू, काहीतरी छान वाटून जाते. फील गुड असे... आणि त्यात भर घालायला मग तो येतो, सोबत तुपाची तामली घेऊन. शेवटी भक्त तृप्त की देवाला भरून पावते.
गणपती बाप्पा मोरया.