Join us

सूरज चव्हाणला अजित पवार बांधून देत असलेलं घर पाहून व्हाल थक्क, अंकिता वालावलकरने शेअर केला व्हिडीओ़

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 15:50 IST

एकिकडे सुरजचं घर बांधून तयार होत आहे. तर दुसरीकडे सूरज लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे.

 Suraj Chavan New Home Ankita Walawalkar Shares Video: 'बिग बॉस' मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सुरज चव्हाण सतत चर्चेत असतो.  गरीबीच्या परिस्थितीतून वर येत सुरजनं स्वतःच वेगळं असं विश्व तयार केलं. 'बिग बॉस'च्या घरात जाण्यापूर्वी सूरजने एक स्वप्न पाहिलं होतं. आपलं हक्काचं घर असावं, असं त्याचं स्वप्न होतं.  'बिग बॉस'च्या घरातही सूरजने आपल्या गावात हक्काचं घर बांधण्याची इच्छा बोलून दाखवली होती. 'बिग बॉस' जिंकल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याची भेट घेतली होती. त्यावेळी सूरजला घर बांधून देण्याचं आश्वासन अजित पवार यांनी दिलं होतं. त्यानंतर सूरजच्या घराचं बांधकाम देखील सुरू झालं. आता घराचं बांधकाम हे अंतिम टप्प्यात आलं आहे. नुकतंच अंकिता वालावलकर हिनं सुरजची भेट घेतली. यावेळी तिनं सुरजच्या नव्या घराची झलकही चाहत्यांना दाखवली.

अंकिता ही सुरजच्या गावी गेली होती. यावेळी सूरजने अंकिताला त्याचं संपूर्ण घर दाखवलं. ज्याचं बांधकाम अजूनही सुरू आहे. या 'ड्रीम होम'च्या बांधकामाची झलक दाखवणारा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. व्हिडीओमध्ये दिसतं की, सुरजने अंकिताला घराचा प्रत्येक कोपरा दाखवला. घराच्या पायऱ्या आणि इतर काही काम अजूनही अपूर्ण आहे, पण घराची रचना भव्य दिसत आहे. लवकरच बांधकाम पूर्ण झाल्यावर सुरज आपल्या या नव्या घरात गृहप्रवेश करेल.

एकिकडे सुरजचं घर बांधून तयार होत आहे. तर दुसरीकडे सूरज लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे. अंकिताने सूरजचं घर तर पाहिलंच, पण त्याच्या होणाऱ्या बायकोचीही भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अंकिताने सूरजच्या होणाऱ्या बायकोचा चेहरा लपवला. सूरजच्या लग्नाला जाणं कदाचित शक्य नसल्याने ही एक सदिच्छा भेट होती, असं अंकितानं व्हिडीओमध्ये सांगितलं.  हा व्हिडीओ क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 

दरम्यान, काही दिवसांपुर्वीचं अजित पवार यांनी सूरज चव्हाणच्या नव्या घराच्या बांधकामाची पाहणी केली. तसेच महत्त्वाच्या सूचनाही दिल्या होत्या. अजित पवार यांच्या एक्स अकाउंटवर सुरजच्या घराच्या पाहणीचे फोटो पोस्ट केले आहेत.  'बिग बॉस मराठी ५'नंतर सूरज 'झापुक झुपूक' या सिनेमात झळकला. 

टॅग्स :अंकिता प्रभू वालावलकरअजित पवारसुंदर गृहनियोजनबिग बॉस मराठी