'नवरी मिळे हिटलरला' ही झी मराठीवरची मालिका चांगलीच गाजली. या मालिकेत सरस्वतीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री भूमिजा पाटीलला प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळालं. अशातच भूमिजाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा केलाय. काही महिन्यांपूर्वी भूमिजाचा साखरपुडा झाला होता. लग्नही होणार होतं. पण दुर्दैवाने भूमिजाचं लग्न झालं नाही, असा खुलासा तिने केलाय. काय म्हणाली अभिनेत्री?
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत भूमिजा म्हणाली, ''सगळ्यांनाच माहितीये, की माझा साखरपुडा झालाय. लग्न होणार होतं. बऱ्याच लोकांना असंही वाटतंय की, आता माझं लग्न झालंय. पण दुर्देवाने ते आता नाही आहे. प्रत्येक मुलाखतीत बोललेय की, मी लग्नासाठी खूप उत्सुक आहे. मला लग्न करायचंय. पण काही कारणांमुळे आम्ही आता वेगळे झालो आहोत. हा माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा निर्णय होता. ज्याची मला खूप भीती वाटत होती.''
''आता लोक काय म्हणतील, लोक काय विचार करतील किंवा काय होईल? पण या सगळ्या परिस्थितीत कुटुंबाने खूप सपोर्ट केला. जिथे मला वाटतंय की त्रास होतोय, मी काहीतरी चुकीचा निर्णय आयुष्यात घेतलाय. त्यावेळी मी ही गोष्ट पहिल्यांदा ताईसोबत बोलले. तर इथे हा मुद्दाच आला नाही की, लोक काय म्हणतील. ते मला म्हणाले- तू ठाम आहेस! तुला याचा त्रास नाही होणारेय, तर आम्ही तुझ्यासोबत आहोत. तुला त्रास होणार असेल तर आम्हाला बघवणार नाही. तर ठीकेय, तुझ्यासोबत आम्ही आहोत. तू घे निर्णय. या सगळ्या काळात माझं कुटुंब माझ्यासोबत होतं. ती खूपच वाईट फेज होती.''