'कोकण हार्टेड गर्ल' अर्थात अंकिता वालावलकरची (ankita prabhu walawalkar) चांगली क्रेझ आहे. बिग बॉस मराठीच्या (bigg boss marathi) पाचव्या सीझननंतर अंकिता प्रभू वालावकरच्या फॅन फॉलोईंगमध्ये प्रचंड वाढ झाली. अंकिता वालावलकर लवकरच तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. अंकिताच्या घरी लगीनघाई सुरु झालीय. अंकिताने सोशल मीडियावर घरी सुरु असलेल्या लगीनघाईचा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत अंकितासाठी तिच्या कुटुंबाने खास सरप्राइज दिलंय. ते पाहून अंकिता भावुक झालेली दिसली.
अंकिताचा भावुक व्हिडीओ
व्हिडीओत पाहायला मिळतं की, सर्व शूट आटपून अंकिता प्रवास करुन एअरपोर्टने तिच्या कोकणातील घरी जाते. तिथे घरी आल्यावर अंकिताला खास सरप्राइज मिळतं. तिच्या घरच्यांनी 'अभी ना जाओ छोडकर' या हिंदी गाण्यावर जमिनीवर बसून खास डान्स केलेला दिसतो. अंकिताचे बाबा, तिची आई, तिच्या बहिणी आणि संपूर्ण कुटुंब हे नृत्य करताना दिसतं. अंकिता हे गोड सरप्राइज पाहताच भावुक झालेली दिसते. ती सर्वांकडे पाहत राहते आणि तिच्या डोळ्यांतून पाणी येतं.
पुढे अंकिताच्या घरचे तिचं औक्षण करुन तिच्यावर फुलं उधळतात. अंकितासाठी खास 'नवराई' असं नाव लिहिलेली रांगोळी काढल्याचं दिसतं. पुढे अंकिताला आवडणारा गोड पदार्थ सगळे तिला खाऊ घालतात. अंकिता घरच्यांनी दिलेल्या या प्रेमामुळे चांगलीच भारावलेली दिसते. अंकिता लवकरच तिचा बॉयफ्रेंड आणि संगीतकार कुणाल बेनोडेकरसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. अंकिता बिग बॉसमधून बाहेर आल्यावर तिने प्रेमाची जाहीर कबूली दिली.