दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) अडचणी वाढतच आहेत. संध्या थिएटर दुर्घटनेप्रकरणी १३ डिसेंबरला अल्लूला हैदराबादपोलिसांनी अटक केली होती. त्याला एक रात्र तुरुंगात घालवावी लागली. दुसऱ्या दिवशी त्याची जामिनावर सुटका झाली. पण आता अल्लूला पुन्हा पोलिसांनी समन्स बजावलं आहे. आज सकाळी ११ वाजता त्याला चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. ४ डिसेंबर रोजी हैदराबाद येथील संध्या थिएटरमध्ये झालेल्या 'पुष्पा २' च्या स्क्रीनिंगला प्रचंड गर्दी झाली होती. यामध्ये चेंगराचेंगरी झाली आणि एका महिलेचा मृत्यू झाला. तर तिचा ८ वर्षीय मुलगा व्हेंटिलेटरवर आहे. त्याचं ब्रेनडॅमेज झाल्याचीही माहिती काही दिवसांपू्र्वी समोर आली. याप्रकरणी अल्लू अर्जुनलाही दोषी मानत अटक करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी अल्लूच्या घरावर काहींनी दगडफेक केली. त्याच्याविरोधात प्रदर्शन केलं. आज अल्लू अर्जुनला पोलिसांनी समन्स बजावलं आहे. त्याला आज सकाळी ११ वाजता चिक्कडपल्ली पोलिस स्टेशनमध्ये हजर राहावं लागणार आहे. यासंबंधी चर्चा करण्यासाठी अल्लूचे वकील काल संध्याकाळी त्याच्या घरी आले होते.
तर दुसरीकडे तेलंगणातील काँग्रेसचे वरिष्ठ नेता थेनमार मल्लन्ना यांनी अल्लू अर्जुनविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी 'पुष्पा २' मधील एका सीनवरुन ही मेडिपल्ली पोलिस स्थानकात त्यांनी तक्रार केली आहे. सिनेमात एका सीनमध्ये पोलिस दलाचा अपमान केल्याचं त्यांचं म्हणणं आहे.