मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू व्यक्तिमत्व, ज्येष्ठ अभिनेते, पटकथा लेखक आणि दिग्दर्शक श्रीनिवासन यांचे शनिवारी (२० डिसेंबर २०२५) सकाळी कोची येथील एका सरकारी रुग्णालयात निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत होते. श्रीनिवासन हे मल्याळम सिनेसृष्टीतील सक्रीय होते.
श्रीनिवासन यांच्या पश्चात त्यांची पत्नी विमला आणि दोन मुले विनीत श्रीनिवासन आणि ध्यान श्रीनिवासन असा परिवार आहे. त्यांची दोन्ही मुले देखील मल्याळम चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. श्रीनिवासन यांचे पार्थिव एर्नाकुलम टाऊन हॉलमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले असून, त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनिवासन यांना डायलिसिससाठी एका खाजगी रुग्णालयात नेले जात असताना अचानक श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना तातडीने त्रिपुनिथुरा येथील शासकीय तालुका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. २०२२ मध्ये त्यांच्यावर हृदयाची मोठी शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती सातत्याने खालावत होती.
श्रीनिवासन यांनी १९७६ मध्ये 'मणीमुझक्कम' या चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली होती. आपल्या पाच दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. अभिनय, दिग्दर्शन आणि पटकथा लेखन या तिन्ही क्षेत्रात त्यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. विशेषतः त्यांनी रेखाटलेली राजकीय व्यंगचित्रे आणि सामाजिक विषयांवरील पटकथा आजही मल्याळम चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड मानल्या जातात.
त्यांनी दिग्दर्शित केलेला 'वडक्कूनोक्कियंत्रम' (१९८९) हा चित्रपट क्लासिक मानला जातो, तर 'चिंताविष्तय्या श्यामला' (१९९८) या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी श्रीनिवासन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना म्हटले की, "श्रीनिवासन यांचे जाणे हे मल्याळम चित्रपटसृष्टीचे कधीही न भरून निघणारे नुकसान आहे. सामान्य माणसाचे जीवन पडद्यावर सहजतेने मांडणारा एक महान कलाकार आपण गमावला आहे."
Web Summary : Malayalam cinema loses veteran actor Sreenivasan, aged 69. He passed away in Kochi due to health issues. He acted in over 200 films, leaving behind a rich legacy in acting, direction, and screenwriting. His funeral will be held at his residence.
Web Summary : मलयालम सिनेमा के दिग्गज अभिनेता श्रीनिवासन, 69 वर्ष की आयु में निधन हो गया। कोच्चि में स्वास्थ्य समस्याओं के कारण उनका निधन हुआ। उन्होंने 200 से अधिक फिल्मों में अभिनय किया, अभिनय, निर्देशन और पटकथा लेखन में एक समृद्ध विरासत छोड़ी। उनके आवास पर अंतिम संस्कार किया जाएगा।