Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 18:46 IST

1 / 10
हरियाणाच्या गुरुग्राम येथून कोलकाता पोलिसांनी एका २२ वर्षीय सोशल मिडिया इन्फ्लूएन्सर आणि पुण्यात लॉ यूनिवर्सिटीत शिकत असलेल्या शर्मिष्ठा पनोलीला अटक केली आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर बॉलिवूड कलाकारांनी बाळगलेल्या मौनावर तिने एक व्हिडिओ अपलोड केला होता. या व्हिडिओ एका विशिष्ट धर्मावर तिने टिप्पणी केल्याचा आरोप आहे.
2 / 10
शर्मिष्ठा पनोली हिचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडिओनंतर कोलकाता येथे तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर युवतीला आणि तिच्या कुटुंबाला नोटीस पाठवली तेव्हापासून ती फरार होती. कोर्टाने तिचे अटक वॉरंट काढल्यानंतर कोलकाता पोलिसांनी गुरुग्राम येथून शर्मिष्ठाला ताब्यात घेतले.
3 / 10
शर्मिष्ठाने अपलोड केलेल्या व्हिडिओनंतर तिला धमक्या मिळू लागल्या होत्या. त्यानंतर वाद वाढलेला पाहून युवतीने व्हिडिओ डिलिट करत त्यावरून माफीही मागितली. मात्र तरीही शर्मिष्ठा पनोली हिला अटक करून कोलकाता पोलीस पुढील चौकशी करत आहेत. त्यावरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
4 / 10
शर्मिष्ठा पनोली हिच्या अटकेनंतर भाजपाने ममता बॅनर्जी सरकारवर निशाणा साधला आहे. शर्मिष्ठाला ज्या व्हिडिओसाठी अटक करण्यात आली, त्यावर तिने माफी मागून व्हिडिओ डिलिट केला परंतु टीएमसी नेते सनातन धर्माचा अपमान करतात, जय श्री रामवर शिवी देतात त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली जात नाही. त्यांना अटकही होत नाही असं भाजपा प्रदेशाध्यक्ष सुकांत मजूमदार यांनी म्हटलं.
5 / 10
शर्मिष्ठा पनोली ही लॉ यूनिवर्सिटीची विद्यार्थिनी आहे. त्याशिवाय ती सोशल मीडियावर एक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामवर तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. त्यातील एका पाकिस्तानी फॉलोअर्सने पहलगाम हल्ल्यानंतर तिला प्रश्न विचारले होते. त्यावर उत्तर देत शर्मिष्ठा पनोलीने व्हिडिओ अपलोड केला होता. या व्हिडिओत तिने बॉलिवूड कलाकारांना पहलगाम हल्ल्यावर मौन बाळगल्यावरून प्रश्न उचलले, त्यातूनच हा वाद निर्माण झाला.
6 / 10
शर्मिष्ठा पनोली म्हणाली होती की, बॉलिवूडमधील ३-४ कलाकार असे आहेत जे सिनेमात देशासाठी जीव देण्याची भाषा करतात परंतु जेव्हा खरेच परिस्थिती येते देशासाठी उभं राहायची वेळ येते तेव्हा त्यांच्या तोंडून एकही शब्द निघत नाही. या लोकांची लाज वाटते असं तिने म्हणत विशिष्ट धर्माचा उल्लेख केला होता.
7 / 10
तिचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तान आणि भारतातील मुस्लिम युझर्सने तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. काहींनी शर्मिष्ठाला बलात्काराचीही धमकी दिली. शर्मिष्ठाने तिच्या अकाऊंटवरून धमक्यांचे काही स्क्रिनशॉट्सही शेअर केले होते. शर्मिष्ठावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तिने व्हिडिओ डिलिट करत माफी मागितली
8 / 10
शर्मिष्ठा पनोलीच्या अटकेनंतर अनेक प्रतिक्रिया पुढे येत आहेत. ३० मे रोजी कोलकाता पोलिसांनी तिला अटक केली. त्यानंतर ३१ मे रोजी शर्मिष्ठाला कोर्टासमोर हजर केले तेव्हा तिला १३ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शर्मिष्ठा पनोलीच्या अटकेचे प्रकरण सातासमुद्रापारही गाजले आहे. नेदरलँड डच येथील खासदार गिर्ट विल्डर्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आवाहन करत शर्मिष्ठाच्या अधिकारांचे रक्षण करण्याची मागणी केली आहे. तिची अटक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे हनन करणारी आहे असं त्यांनी म्हटलं.
9 / 10
शर्मिष्ठाच्या अटकेवर आंध्र प्रदेशच्या उपमुख्यमंत्री पवन कल्याणही संतापले आहेत. जेव्हा टीएमसीचे नेते सनातन धर्माचा अपमान करतात, तेव्हा काय होते, जेव्हा आमच्या धर्माला वाईट म्हटलं जाते, तेव्हा हा आक्रोश कुठे जातो. त्यांना त्वरीत अटक का होत नाही असं पवन कल्याण यांनी विचारले आहे.
10 / 10
भाजपा खासदार आणि अभिनेत्री कंगना रानौत हिनेही शर्मिष्ठा पनोलीच्या अटकेवरून ममता बॅनर्जी सरकारवर निशाणा साधला. कायद्याचा वापर करून कोणाला त्रास देणे योग्य नाही. शर्मिष्ठाने माफी मागून व्हिडिओही डिलिट केला. तरीही तिला अटक केली. पश्चिम बंगालला उत्तर कोरिया बनवू नका असा टोला कंगनाने ममता बॅनर्जी यांना लगावला आहे.
टॅग्स :भारतपाकिस्तानबॉलिवूडऑपरेशन सिंदूरकंगना राणौतपहलगाम दहशतवादी हल्ला