Join us
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रांगणात नृत्य करणार नाही! प्राजक्ता माळीचा निर्णय; कारण सांगत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 16:22 IST

कुटुंबियांशी बोलून मी हा निर्णय घेतला आहे... - प्राजक्ता माळी

अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) आज महाशिवरात्रीनिमित्त नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमंदिराच्या प्रांगणात आयोजित शिवार्णमस्तु कार्यक्रमाला उपस्थित राहणार होती. तसंच ती तिथे शिवस्तुतीच्या दोन रचनाही सादर करणार होती. प्राजक्ता स्वत: कथ्थक नृत्यात पारंगत असल्याने तिला देवस्थाननेच आमंत्रित केलं होतं. मात्र माजी विश्वस्तांनी काल याविरोधात तक्रार केली होती. यावर प्राजक्ताने आपण कार्यक्रमाला जाणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र आज तिने कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच यामागचं कारणही सांगितलं आहे.

प्राजक्ता माळीने इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती म्हणते, "सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा. आज त्र्यंबकेश्वरमंदिराच्या प्रांगणात  शिवार्पणमस्तु कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे . पहिल्यापासूनच या कार्यक्रमाला फार प्रसिद्धी द्यायची नाही असं ठरलं होतं. कारण मंदिराचं प्रांगणं, क्षेत्रफळ, तिथे किती माणसं कार्यक्रम पाहण्यासाठी बसू शकतात या सगळ्या गोष्टींचा विचार करता मीही सोशल मीडियावर या कार्यक्रमाविषयी अजिबात माहिती दिली नव्हती. परंतू काल दिवसभरात या कार्यक्रमाला अनावश्यक प्रसिद्धी मिळाली आणि त्यामुळे आता अवास्तव गर्दीची भीती, काळजी प्रशासनाच्या मनात आहे. त्यामुळे मी कुटुंबियांशी बोलून निर्णय घेत आहे की कमिटमेंट आहे म्हणून कार्यक्रम होईल. माझे सहकलाकार माझ्याशिवाय कार्यक्रम सादर करतील."

ती पुढे म्हणाली, "अर्थातच याने माझ्या आनंदावर विरजण पडणार आहे. परंतू वैयक्तिक सुखापेक्षा आपल्यामुळे प्रशासनावर अतिरिक्त ताण येऊ नये ही बाब मला जास्त मोठी आणि महत्वाची वाटते. त्यामुळे सर्वस्वी हा माझा निर्णय आहे. जिथे भाव असतो तिथे देव असतो यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे मी कुठेही बसून शिवाची आराधना केली तरी शिवापर्यंत ती पोहोचणारच आहे. तिथे कोणाचाही हिरमोड होऊ नये, कोणाच्याही मनात कसलीही शंका येऊ नये म्हणून माहितीकरता मी हा व्हिडिओ बनवत आहे. हर हर महादेव."

टॅग्स :प्राजक्ता माळीमराठी अभिनेतानाशिकत्र्यंबकेश्वरमंदिरनृत्यमहाशिवरात्रीसोशल मीडिया