Join us

मायकल जॅक्सनच्या सॉक्सचा लीलाव! 'इतक्या' रुपयांची लागली बोली; आकडा ऐकून चक्रावून जाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 16:23 IST

मायकल जॅक्सनच्या मळक्या सॉक्सचा लीलाव, इतक्या रुपयांना लागली बोली, किंमत ऐकून तुम्ही थक्कच व्हाल

मायकल जॅक्सन हा आंतरराष्ट्रीय जगतातील प्रसिद्ध पॉप स्टार म्हणून प्रसिद्ध आहे. मायकल जॅक्सनची गाणी आजही तरुणाईला वेड लावतात. मायकल जॅक्सन आज या जगात नसला तरीही त्याच्या अनेक वस्तूंचा लीलाव करण्यात आला. अशातच मायकल जॅक्सनच्या अशाच एका साध्या गोष्टीची लाखो रुपयात बोली लावली गेली. त्यामुळे जॅक्सनची क्रेझ किती आहे, हेच यातून समजतंय. मायकलने वापरलेला एक मळका मोजा तब्बल लाखो रुपयांत विकला गेला. जाणून घ्या, याचबद्दल

मायकलच्या मोज्याची किंमत लाखोंच्या घरात

हॉलिवूडचा पॉप सम्राट म्हणून ओळखला जाणारा मायकल जॅक्सनचा एक जुना सॉक्स नुकताच फ्रान्समध्ये झालेल्या लिलावात तब्बल ८,८२२ अमेरिकन डॉलर्स (सुमारे ७.३५ लाख रुपये) या अव्वाच्या सव्वा किंमतीला विकला गेला. हे मोजे १९९७ साली झालेल्या ‘HIStory World Tour’ दरम्यान फ्रान्सच्या निम्स शहरात जॅक्सनने परफॉर्म करताना वापरले होते.

सदर सॉक्सवर जुन्या काळात वापरल्या गेल्याचे स्पष्ट चिन्ह दिसत असून ते ऑफ-व्हाइट रंगाचे आहेत, त्यावर पिवळसर झालेली चमचमीत राईनस्टोन्स असून काही ठिकाणी डागही पडलेले आहेत. एका स्टेज टेक्निशियनला जॅक्सनच्या परफॉर्मन्सनंतर त्याच्या ड्रेसिंग रूमच्या जवळ हे सॉक्स सापडले होते. हे सॉक्स त्याने नीट जपून ठेवले होते. सध्या हे सॉक्स एका फ्रेममध्ये जतन करण्यात आले आहेत.

या लिलावाचे आयोजन फ्रान्सच्या ‘Drouot’ या निलामी संस्थेने केले होते. लिलावाची सुरुवातीची किंमत ३,००० ते ४,००० युरो इतकी होती, पण चाहत्यांच्या वाढत्या प्रतिसादामुळे ही किंमत तब्बल ७,६८८ युरोपर्यंत पोहोचली. याआधीही मायकल जॅक्सनच्या काही वस्तूंना लिलावात मोठी किंमत मिळालेली आहे. २००९ मध्ये त्याने मूनवॉक करताना वापरलेली ग्लोव्ह ३,५०,००० डॉलर्सना विकली गेली होती, तर २०२३ मध्ये त्याने स्टेजवर टाकलेली फेडोरा टोपी ८०,००० डॉलर्सना विकली गेली होती.

लिलावकर्त्या ऑरोर इल्ली यांनी या सॉक्सला "मायकल जॅक्सनच्या चाहत्यांसाठी श्रद्धास्थान ठरेल अशी वस्तू" असे वर्णन केले. या वस्तूचे महत्त्व फक्त ती जुनी किंवा वापरलेली आहे म्हणून नाही, तर ती जॅक्सनच्या ‘बिली जीन’ या गाण्यावरील प्रसिद्ध परफॉर्मन्सच्या आठवणींसोबत जोडलेली असल्यामुळे आहे.

टॅग्स :हॉलिवूडटेलिव्हिजनबॉलिवूडटिव्ही कलाकार