Join us

रस्त्यावर काम करणाऱ्या तरुणाचा अभिनेत्रीने घेतला जीव; भरधाव कारने धडक देऊन काढला पळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 17:31 IST

हिट-अँड-रन प्रकरणात अभिनेत्री नंदिनी कश्यपच्या अडचणी वाढल्या आहेत.

Actress Nandini Kashyap Arrested: आसाममधील अभिनेत्री नंदिनी कश्यपला पोलिसांनी हिट अँड रन प्रकरणात अटक केली आहे. २१ वर्षीय तरुणाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या अभिनेत्री नंदिनी कश्यपच्या अडचणीत वाढ झाली आहे. अभिनेत्री नंदिनी कश्यपच्या भरधाव गाडीने २१ वर्षीय तरुणाला चिरडलं होतं ज्यामुळे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. या घटनेमुळे राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत होता. विद्यार्थी संघटनांकडून अभिनेत्रीच्या अटकेची मागणी केली जात होती. अपघाताच्या घटनेनंतर पाच दिवसांनी ही कारवाई करण्यात आली.

गुवाहाटी हिट अँड रन प्रकरणात आसाममधील अभिनेत्री नंदिनी कश्यपला अटक करण्यात आली. २५ जुलै रोजी २१ वर्षीय समीउल हक याला धडक देऊन त्याच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरल्याचा आरोप नंदिनीवर आहे. नंदिनीने त्याला धडक दिल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला होता. मंगळवारी रात्री जखमी झालेल्या समीउल हक याचा रुग्णालयात मृत्यू झाला. ही बातमी परसताच सोशल मीडियाच्या माध्यमातून निषेध नोंदवण्यात येऊ लागला. अखेर गोंधळानंतर गुवाहाटी पोलिसांनी नंदिनीला अटक केली. तसेच पोलिसांनी अभिनेत्रीची गाडीही जप्त केली आहे. आसाम पोलीस यापूर्वी हिट अँड रन प्रकरणात नंदिनीची चौकशी करत होते.

मंगळवारी रात्री उशिरा नंदिनीला उत्तर गुवाहाटी येथून अटक करण्यात आली आणि प्राथमिक चौकशीसाठी दिसपूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर तिला पानबाजार येथील महिला पोलिस ठाण्यात नेण्यात आले, जिथे दुपारी १:३० च्या सुमारास तिला औपचारिकरित्या अटक करण्यात आली. तिच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२५ जुलै रोजी पहाटे ३ वाजता नंदिनी कश्यपच्या भरधाव गाडीने धडक दिल्याने समीउल गंभीर जखमी झाला. समीउल पॉलिटेक्निकचा विद्यार्थी होता. समीउल गुवाहाटी मेडिकल कॉलेजमध्ये ५ दिवस जीवन आणि मृत्यूशी झुंजत होता. अखेर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. समीउल हक हा गुवाहाटी महानगरपालिकेच्या टीमसोबत रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करत होता. तो स्ट्रीटलाइट दुरुस्त करत असताना कश्यपच्या भरधाव बोलेरो एसयूव्हीने त्याला धडक दिली. ही बोलेरो नंदिनी कश्यप चालवत होती. गाडी खूप वेगाने जात होती आणि समीउलला धडकल्यानंतरही ती थांबली नाही. समीउलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि अनेक फ्रॅक्चर झाले. 

टॅग्स :गुन्हेगारीआसामअपघातपोलिस