सोनू सूदविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. अंमलबजावणी संचालनालय (ED) सध्या एका मोठ्या अवैध बेटिंग ॲप (illegal betting app) प्रकरणात तपास करत आहे. या प्रकरणी अनेक प्रसिद्ध व्यक्तींना समन्स बजावण्यात आले आहेत. याआधी अभिनेत्री उर्वशी रौतेलाला समन्स बजावण्यात आलं होतं. उर्वशीनंतर आता अभिनेता सोनू सूदला (Sonu Sood) सुद्धा ED कडून समन्स बजावण्यात आलं आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण?
सोनू सूदला समन्स
ईडीने या प्रकरणात सोनू सूदला चौकशीसाठी बोलावले आहे. सोनू सूदवर '1xBet' नावाच्या अवैध ऑनलाइन बेटिंग ॲपची जाहिरात केल्याचा आरोप आहे. या ॲपवर भारतात बंदि आहे. या प्रकरणात पैशांची अफरातफर (money laundering) झाल्याचा संशय आहे, ज्यामुळे ईडीने हा तपास सुरू केला आहे. सोनू सूदला २४ सप्टेंबर रोजी दिल्लीतील ईडीच्या मुख्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.
क्रिकेटपटू आणि अभिनेत्रीही तपासाच्या जाळ्यात
या प्रकरणात फक्त सोनू सूदच नाही, तर अनेक प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि अभिनेत्रींचीही नावे समोर आली आहेत. माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग, युवराज सिंग आणि सुरेश रैना यांनाही या प्रकरणात समन्स बजावण्यात आले आहे. तसेच, अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि माजी खासदार मिमी चक्रवर्ती यांचाही या अवैध बेटिंग ॲपशी संबंध असल्याचा संशय आहे.
ईडीच्या म्हणण्यानुसार, या ॲपवर भारतात बंदी असतानाही सेलिब्रिटी आणि खेळाडूंच्या माध्यमातून त्याचा प्रचार केला जात होता. या सेलिब्रिटींना या ॲपच्या जाहिरातीसाठी पैसे मिळाले होते का, आणि जर मिळाले असतील तर त्या व्यवहारांमध्ये कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाले आहे का, याची चौकशी ईडी करत आहे.