बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि चित्रपट निर्माती फराह खानने अलीकडेच बाबा रामदेव यांच्या हरिद्वार येथील आश्रमात भेट दिली. यावेळी फराहने तिच्या यूट्यूब चॅनलसाठी एक व्लॉग शूट केला. या व्लॉगमध्ये फराहने बाबा रामदेव यांच्या जीवनशैलीची तुलना बॉलीवूड अभिनेता सलमान खानसोबत केली. त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटलं. काय म्हणाली फराह? जाणून घ्या
व्लॉगमध्ये बाबा रामदेव फराहला त्यांच्या आश्रमाचा भव्य परिसर दाखवतात. तेव्हा ते म्हणतात, “आम्ही लोकांच्या राहण्यासाठी राजवाडा बनवला आहे पण आम्ही स्वतः एका झोपडीत राहतो.” यावर फराह खानने मिश्किलपणे उत्तर दिले, “तुम्ही आणि सलमान खान एकसारखेच आहात. तो सुद्धा एका लहानशा १BHK घरात राहतो आणि इतरांसाठी भव्य इमारती बनवतो.” फराहच्या या विनोदी प्रतिक्रियेवर बाबा रामदेव दिलखुलास हसले आणि त्यांनी सहमती दर्शवली.
या व्लॉगमध्ये बाबा रामदेव यांचा साधेपणा आणि मिश्किल स्वभाव सर्वांना दिसून आला. आजवर न पाहिलेले बाबा रामदेव सर्वांना बघायला मिळाले. फराहने बाबा रामदेव यांच्या उत्साहाची प्रशंसा केली. बाबा रामदेव यांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश करावं, असंही फराहने गंमतीत सुचवलं. फराह खानच्या व्लॉगमध्ये बाबा रामदेव यांनी त्यांच्या 'तपस्वी झोपडी'बद्दलही सांगितले, जी जोधपूरच्या दगडांनी बनलेली आहे. त्यांनी फराहला त्यांचा खास कमंडलू दाखवला, ज्याची किंमत सुमारे १ लाख रुपये आहे.
फराहने बाबा रामदेव यांच्या आश्रमात बनवलेला 'एटीएम' (एलोवेरा, हळद आणि मेथी) नावाचा खास सात्विक पदार्थही खाऊन पाहिला. फराहला तो पदार्थ थोडा वाटला. तेव्हा बाबा रामदेव म्हणाले की, हा पदार्थ खाऊन तुम्ही १०० वर्षापर्यंत सुंदर दिसाल. यावर फराह हसली आणि ती रोज हा पदार्थ खाईल असं म्हणाली. अशाप्रकारे बाबा रामदेव आणि फराह खानचा हा नवीन व्लॉग चांगलाच चर्चेत आहे.