Vicky Kaushal: विकी कौशलच्या (Vicky Kaushal) 'छावा' (Chhaava) सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ पाहायला मिळतो आहे. १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे. सध्या 'छावा'चे सगळे शो हाऊसफुल्ल सुरू असल्याचे पाहायला मिळत आहेत. दरम्यान, या चित्रपटाचं शिवाय त्यातील कलाकारांचं शिवप्रेमी भरभरुन कौतुक करत आहेत. अभिनेता विकी कौशल, रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि अक्षय खन्ना यांच्या अभिनयाला सिनेरसिकांकडून पसंती मिळताना दिसते आहे. प्रदर्शनाच्या अवघ्या ४ दिवसांमध्ये छावा चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. अशातच चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता विकी कौशल मुंबईतील बाबुलनाथ मंदिरात पोहोचला. याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.
दरम्यान, विकी कौशलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. 'छावा' सिनेमाच्या यशानंतर अभिनेता विकी कौशलने मुंबईतील बाबुलनाथ मंदिर येथे जाऊन महादेवाची मनोभावे पूजा देखील केली आहे. या व्हिडीओमध्ये विकी कौशल पारंपरिक वेशभूषेत पाहायला मिळतोय कुर्ता-पायजमा परिधान करून पायात कोल्हापुरी चप्पल अशा साध्या लूकमध्ये तो दिसतोय. शिवाय गळ्यात रुद्राक्ष माळा देखील घातल्या होत्या. विकी कौशलचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी त्यांच कौतुक करत व्हिडीओवर तुफान लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. छत्रपती संभाजी महाराजांची शौर्य गाथा सांगणारा हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहे. मोठ्या पडद्यावर ही कथा पाहून प्रेक्षक भावुक झाले आहेत. सगळीकडे या चित्रपटाचं प्रचंड कौतुक होत आहे, तसेच कमाईतही सातत्याने वाढ होत आहे.