Join us

"चित्रपट लोकांच्या मनात..." सैयारा' चित्रपटाबाबत अजित पवारांनी मांडलं स्पष्ट मत, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 13:19 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांसोबत संवाद चित्रपटावर भाष्य केलं आहे.

गेल्या आठवड्यात दोन बिग बजेट आणि बहुचर्चित सिनेमे रिलीज झाले. ते म्हणजे 'सैयारा' आणि 'येरे येरे पैसा ३'. मोहित सुरींच्या 'सैयारा'ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. विशेषतः तरुण-तरुणींनी केलेल्या व्हायरल रील्समुळे 'सैयारा' चित्रपटाला अधिक प्रसिद्धी मिळाली आणि बॉक्स ऑफिसवरही त्याचा थेट फायदा झाला. 'सैयारा'ची वाढती लोकप्रियता पाहता, अनेक मल्टिप्लेक्समध्ये या चित्रपटाचे शो वाढवण्यात आले.   पण, 'सैयारा'चित्रपटामुळे 'येरे येरे पैसा ३' या मराठी चित्रपटाला प्राइम टाइममध्ये स्लॉट मिळत नाही, असा आरोप होत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावर तीव्र संताप व्यक्त केला. अशातच आता यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांसोबत संवाद साधताना भाष्य केलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनामराठी चित्रपटांना स्क्रीन मिळत नाहीत याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की,"मी तुम्हाला सांगू का... जर चित्रपट उत्तम असेल, तर सगळे चित्रपट लावतात. मला आमचा मागचा काळ आठवतो, दादा कोंडकेंचे सात की आठ चित्रपट सिल्व्हर जुबिली ठरले. आज लोकांना बळजबरी करु शकत नाही. उत्तम चित्रपट आला की लोक त्या चित्रपटाला प्रतिसाद देतात. कोटी रुपये खर्च केले आणि चित्रपट लोकांच्या मनात उतरला नाही तर तुम्ही कुणावरही बळजबरी करु शकत नाही", असं अजित पवार यांनी  स्पष्ट शब्दांत म्हटलं. 

सैयारा vs येरे येरे पैसा ३

संजय जाधव दिग्दर्शित 'येरे येरे पैसा ३' चित्रपटाची निर्मिती मनसे नेते अमय खोपकर यांनी केली आहे. उमेश कामत, सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित, आनंद इंगळे, संजय नार्वेकर, विशाखा सुभेदार अशी हटके स्टारकास्ट या सिनेमात दिसत आहे. दुसरीकडे  'सैयारा' या सिनेमातून अहान पांडे आणि अनीत पड्डा या कलाकारांनी पहिल्यांदाच सिनेमात काम केलंय.  अहान पांडेने या सिनेमाच्या निमित्ताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय. अहान हा अभिनेत्री अनन्या पांडेचा चुलत भाऊ आहे. दरम्यान, 'सैयारा' या सिनेमाच्या कमाईबद्दल सांगायचं तर या सिनेमानं जगभरात ३०० कोटींच्या जवळपास कमाई केली आहे.

टॅग्स :अजित पवारमनसेसिनेमामराठी चित्रपट