आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज ७५ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त जगभरातील माणसं आणि राजकीय व्यक्ती पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. त्यानिमित्त एक खास गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एक असा मराठमोळा व्यक्ती ज्याला मोदींचा डुप्लिकेट म्हणून ओळख मिळाली. त्यामुळे हा व्यक्ती चांगलाच लोकप्रिय झाला. राजकीय सभांपासून ते बॉलिवूड पार्ट्यांपर्यंत या व्यक्तीची हजेरी दिसते. कोण आहे हा मोदींचा डुप्लिकेट? जाणून घ्या.
पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट आहे तरी कोण?
या व्यक्तीचं नाव आहे विकास महंते. मुंबई येथील मालाडला राहणारे विकास महंते हे एक व्यावसायिक आहेत. त्यांचं आयुष्य घर ते ऑफिस एवढंच मर्यादित होतं. परंतु एके दिवशी त्यांनी त्यांच्या लूकमध्ये एक छोटासा बदल केला. त्यांनी आपली दाढी वाढवली आणि अहो आश्चर्यम! त्यांच्या दिसण्यात कमालीचा बदल झाला. सुरुवातीला आपण काय केलंय हे त्यांच्या लक्षात आलं नाही. परंतु हा छोटासा बदललेला लूक त्यांना आयुष्यभर एक नवीन ओळख देईल, याची त्यांना कल्पना नव्हती.जेव्हा विकास घराबाहेर पडायचे तेव्हा त्यांना बघून लोक काहीवेळ थांबायचे. त्यांच्याकडे पाहून हसायचे आणि पंतप्रधान मोदी समजून त्यांना सेल्फी देण्याची विनंती करायचे. त्यांचा चेहरा, दाढी, कपडे, चालणं, बोलणं मोदींशी मिळतंजुळतं होतं. अनेकदा 'तो मी नव्हेच', असं त्यांना सांगावं लागायचं.
राजकीय वर्तुळात आणि फिल्मी दुनियेत मिळाली संधीविकास महंते यांच्या आयुष्याला मोठं वळण तेव्हा मिळालं जेव्हा २०१४ च्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण देशभर सुरु होतं. विकास महंते यांची लोकप्रियता इतकी होती की, भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक प्रचारासाठी त्यांना महाराष्ट्र आणि अमृतसर येथे आमंत्रण देण्यात आलं. त्यांना पाहण्यासाठी प्रचारसभांमध्ये मोठी गर्दी व्हायची. तेव्हा लोकांशी बोलून खास शैलीने विकास यांनी त्यांच्यावर छाप पाडली. केवळ राजकीय सभाच विकास महंतेंनी गाजवल्या नाहीत तर बॉलिवूडमध्येही त्यांना संधी मिळाली. विकास यांनी फराह खान यांच्या 'हॅपी न्यु इयर' या सिनेमात एक छोटीशी भूमिका केली. त्यानंतर अक्षय कुमारच्या 'मिशन मंगल' सिनेमातही त्यांनी काम केलं. पुढे २०१७ मध्ये 'मोदी का गाँव' या सिनेमात त्यांनी पंतप्रधान मोदींची भूमिका साकारली. या सिनेमात मोदी सरकारची रणनीती आणि विकासकामांना दाखवण्यात आलं होतं.
जेव्हा पंतप्रधान मोदींना भेटले विकासकाही वर्षांपूर्वी '६९५' हा सिनेमा आला होता. त्यावेळी विकास महंतेंनी TV9 ला दिलेल्या मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. २०१४ साली गुजरातमध्ये ते मोदींना पहिल्यांदा भेटले. त्यावेळी नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी विकास यांना बघून मोदींचा हसू आवरलं नाही.
विकास यांचं मोदींनी निरिक्षण केलं. पुढे मोदी हसून म्हणाले, ''लोकसभा निवडणूक जवळ येते. प्रचारासाठी काय प्लॅनिंग केलंय.?'' मोदींसोबत घडलेली ही भेट विकास यांच्या आयुष्यातील संस्मरणीय क्षण होता. त्यानंतर पुढे त्यांना पंतप्रधान मोदींना भेटायची संधी मिळाली नाही. अशाप्रकारे आज विकास महंते स्वतःचा व्यवसाय सांभाळत आहेच शिवाय पंतप्रधान मोदींचे डुप्लिकेट म्हणून लोकांना सकारात्मक संदेश देत आहेत.