Join us

Allu Arjun: मोठी बातमी! अल्लू अर्जुनची तुरुंगात रवानगी, कोर्टाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 16:45 IST

Allu Arjun: पोलिसांनी कोर्टात असं काय सांगितलं ज्यामुळे कोर्टाने दिला हा मोठा निर्णय?

पुष्पा फेम अल्लू अर्जुनला (Allu Arjun) काही वेळापूर्वी हैदराबाद पोलिसांनी अटक केली होती. पुष्पा २ च्या प्रीमियरवेळी संध्या थिएटर चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी अल्लू अर्जुनलाही जबाबदार धरण्यात आलं असून नुकतीच नामपल्ली कोर्टात सुनावणी झाली. पोलिसांना या प्रकरणी आणखी तपास करायचा असल्याने कोर्टाने अल्लू अर्जुनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. आता पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

पोलिसांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, अल्लू अर्जुनने त्याच्या प्रीमियर संदर्भातील कार्यक्रमाची पूर्वकल्पना पोलिसांना दिलीच नव्हती. तसंच पोलिसांनी त्याला प्रीमिअरला जाऊ नको असं स्पष्ट सांगितलं होतं. मात्र तरी अल्लू अर्जुन टीमसह तिथे पोहोचला होता. याचाच परिणाम म्हणजे हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये मोठी गर्दी जमली. या गर्दीला आवर घालणारं कोणीही नव्हतं. परिणामी झालेल्या चेंगराचेंगरीत एका रेवती या महिलेचा मृत्यू झाला तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या नामपल्ली कोर्टाने अल्लू अर्जुनला दोषी मानून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दुसरीकडे ज्या महिलेचा मृत्यू झाला तिच्या पतीने तक्रार मागे घेतली आहे.  तिचे पती मीडियाशी बोलताना म्हणाले, "जे झालं त्यात अल्लू अर्जुनची काहीच चूक नव्हती. बातम्यांमधून मला त्याच्या अटकेबद्दल समजलं. मात्र यात त्याची चूक नाही. मी तक्रार मागे घेतो."  महत्वाचं म्हणजे संबंधित महिलेच्या मृत्यूनंतर अल्लू अर्जुनने त्या कुटुंबाची माफी मागितली होती. तसंच त्यांना २५ लाख रुपयांची मदतही दिली होती.

सध्या अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २: द रुल' थिएटरमध्ये धुमाकूळ घालतोय. मात्र खऱ्या आयुष्यात पुष्पाची रवानही तुरुंगात झाली आहे. हे ऐकताच चाहत्यांची निराशा झाली आहे. 

टॅग्स :अल्लू अर्जुनTollywoodतुरुंगहैदराबादपुष्पा