अल्लु अर्जुन (Allu Arjun) सध्या संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी चर्चेत आहे. ४ डिसेंबर रोजी हैदराबाद येथील संध्या थिएटरमध्ये 'पुष्पा २'च्या स्क्रीनिंगवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. तर तिचा ८ वर्षीय मुलगा व्हेंटिलेटरवर आहे. या प्रकरणाची चौकशी केली असता अल्लू अर्जुनलाही १३ डिसेंबरला अटक करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी त्याची सुटका झाली. हे प्रकरण आणखी चिघळतानाच दिसत आहे कारण काल उस्मानिया विश्वविद्यालयातील सदस्यांनी त्याच्या घराबाहेर तोडफोड केली. यानंतर अल्लू अर्जुनची पत्नी आणि मुलं घराबाहेर पडताना दिसत आहेत.
अल्लू अर्जुन हैदराबाद येथील ज्युबिली हिल्समध्ये राहतो. तिथे त्याचा आलिशान बंगला आहे. काल उस्मानिया विश्वविद्यालयाच्या ८ सदस्यांनी त्याच्या घरावर हल्ला केला. अल्लु अर्जुनचा पुतळा जाळला, घराबाहेरच्या कुंड्या तोडल्या आणि विरोध प्रदर्शन केलं. यानंतर पोलिसांनी आठ लोकांना अटक केली. यावेळी अल्लु अर्जुन घरी नव्हता. मात्र त्याची पत्नी स्नेहा रेड्डी आणि मुलं अरहा, अयान हे घरीच होते. घरावर झालेल्या हल्ल्यानंतर पत्नी आणि मुलं घर सोडून जाताना जिसत आहेत. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.
यानंतर अल्लू अर्जुनने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, "माझ्या घरी आज काय घडलं हे सगळ्यांनीच पाहिलं आहे. मात्र आता योग्य पद्धतीने उत्तर देण्याची वेळ आली आहे. मी ही वेळ योग्य आहे असं समजत नाही. पोलिसांनी हल्ला करणाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे आणि त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. घराबाहेर पोलिसही तैनात आहेत जेणेकरुन पुन्हा कोणी हंगामा करणार नाही. आपण कोणीच अशा घटनांना प्रोत्साहन दिलं नाही पाहिजे. ही वेळ संयम राखण्याची आहे. न्यायव्यवस्था आपलं काम करेल."