औरंगाबाद - पर्यावरणाविषयी सर्वत्र जागृती झाली असली, तरी राज्यभरात अजूनही प्लास्टर ऑफ पॅरिसला (पीओपी)च पसंती असल्याचे यंदाही सिद्ध झाले. निर्माल्य संकलन, कृत्रिम तलावांची संख्या वाढली असून, ध्वनी आणि वायू प्रदूषण काही शहरांमध्ये कमी झाले असले, तरी एकूण परिस्थितीत फारसा बदल झालेला नसल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीतून उघड झाले आहे.

राज्यातील अनेक शहरांत ध्वनी आणि वायू प्रदूषणाची आकडेवारी उशिरापर्यंत उपलब्ध झाली नाही. मात्र, निर्माल्य संकलन आणि कृत्रिम तलावांच्या बाबतीत जवळपास सर्वच ठिकाणी चांगले काम झाले आहे. मुंबईची हवा उत्तम नोंदविण्यात आली आहे. ध्वनी प्रदूषण मात्र १२१ डेसिबल नोंदविण्यात आले. गेल्या दहा दिवसांत मुंबई शहर आणि उपनगरात एकूण १ लाख ९६ हजार ४८३ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यापैकी २० टक्के गणेशमूर्ती या शाडू मातीच्या, कागदी लगद्याच्या होत्या, अशी माहिती बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेश दहिबावकर यांनी दिली. याचा अर्थ जवळपास ९० टक्के मूर्ती पीओपीच्या होत्या.

Devotees Immersed Ganesh Idols With Traditional Reverence And Gaiety in Mumbai | निरोप घेतो बाप्पा, आम्हा आज्ञा असावी; जड अंत:करणाने गणरायाला निरोप

नागपूर शहरात पर्यावरणपूरकगणेशोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला. ३ लक्ष घरगुती गणपतींची स्थापना केली होती. त्यात १ लाख ८० हजार मातीच्या, तर १ लाख २० हजार पीओपी मूर्तींचा समावेश होता. शहरात केवळ फुटाळा तलावावर विसर्जनाची परवानगी देण्यात आली होती. उर्वरित सोनेगाव, अंबाझरी, गांधीसागर, सक्करदरा, नाईक तलाव बॅरिकेडस् लावून बंद करण्यात आले होते. या तलावांजवळ कृत्रिम टॅँकची व्यवस्था होती. त्यामुळे तलावात होणारे प्रदूषण थांबले. शहरात वस्त्यांमध्ये, चौकांमध्ये महानगरपालिकेद्वारे ३०० कृत्रिम टॅँक बनविण्यात आले. प्रत्येक टॅँकजवळ एक असे ३०० निर्माल्य कलश ठेवले होते. त्यातून मोठ्या प्रमाणात निर्माल्य संकलित झाले. मागील वर्षी व यावर्षीही डीजेवर बंदी घातल्याने ध्वनी प्रदूषणाला आळा बसला. ढोल-ताशा पथकांमुळे थोड्या प्रमाणात प्रदूषण झाले. फटाक्यांचा वापर नगण्य प्रमाणात झाला. गुलाल उधळल्यामुळे काही प्रमाणात वायू प्रदूषणाची नोंद झाली. औरंगाबादेत घरातच सुमारे पाच लाखांवर गणपती पीओपीचे होते. सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये तर हे प्रमाण ९९ टक्के होते. शहरात जवळपास ६५ टन निर्माल्य विविध ठिकाणांहून जमा करण्यात आले.

पुणे शहरात ५ लाख ३० हजार १०९ गणपती बसवले गेले. यात पीओपीचेच प्रमाण अधिक होते. शहरात २०१८ साली ९०.४ डेसिबल असलेले ध्वनी प्रदूषण यंदा ११०.८ डेसिबलपर्यंत पोहोचले. जळगावात ७० ते ८० टक्के गणपती पीओपीचे होते. सार्वजनिक गणेश मंडळांचेही ९० ते ९५ टक्के गणपती तेच होते. शाडू मातीचे गणपती केवळ घरगुती होते. त्याचेही प्रमाण २० ते २५ टक्के असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. अकोल्यात केवळ लहान आणि घरगुती गणपतीच्या मूर्तीच काही प्रमाणात शाडूच्या होत्या. मंडळाच्या मोठ्या मूर्ती पीओपीच्या होत्या. येथे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण मोजणारी त्रयस्थ यंत्रणा आहे. ही आकडेवारी उशिरा जाहीर केली जाते. कोल्हापूर शहरात केवळ १० ठिकाणी, तर ग्राणीण भागांत १०० ठिकाणी शाडूच्या मूर्ती होत्या. बाकी सर्वत्र पीओपीच्याच मूर्ती होत्या. सोलापुरात सहा हजार शाडूच्या, सुमारे ४ लाख मूर्ती पीओपीच्या बसविल्या गेल्या होत्या.

पुणे

883073 किलो निर्माल्य जमा करण्यात आले. पण किती निर्माल्य पाण्यात मिसळले गेले याची माहिती मनपाकडे नाही.
5,30,109 गणपती शहरात बसवले गेले. पण त्यात शाडू माती आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची वेगवेगळी आकडेवारी नाही.

कोल्हापूर

955 शहरात तर ग्रामीण भागात ३०६० मूर्तीचे विसर्जन झाले. शहरात २००, तर ग्रामीण भागात २११३ मूर्ती दान करण्यात आल्या.

445 मूर्ती पंचगंगा नदीत विसर्जित. इराणी खणीमध्ये गेल्या वषीर्पेक्षा दुप्पट (१५० वरुन ३५९) मूर्तींचे विसर्जन. पंचगंगेचे पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून इराणी खणचा पर्याय प्रशासनाने गणेश भक्तांना दिला होता.

25 ट्रॉली निर्माल्य शहरातून, तर १२६ ट्रॉली ग्रामीण भागातून संकलित करण्यात आले.

जळगाव

शहरात केवळ मेहरूण तलाव याठिकाणी विसर्जन करण्यात आले. शिवाय काही मंडळांनी गिरणा व तापी नदीवर विसर्जन केले.

10 ठिकाणी विसर्जन मिरणुकीच्या मार्गावर निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे मेहरूण तलावात यंदा केवळ १ ते २ टक्केच निर्माल्य आले. येथून ४५० टन निर्माल्य संकलन झाले.

सोलापूर

07 ठिकाणी शहरात विसर्जन करण्यात आले. यातील ३ ठिकाणी जवळपास एक टन निर्माल्य पाण्यात मिसळले गेले. महापालिकेने 150 टन निर्माल्य एकत्रित केले.

Ganesh Festival 2019 Immersion of idols must be done in artificial ponds | Ganesh Festival 2019 : मूर्ती विसर्जन पर्यायी कुंडांमध्येच करायला हवे!

मुंबई

69 ठिकाणी (गिरगांव चौपाटीसह) मूर्ती विसर्जित करण्यात आल्या. ३२ कृत्रिम तलावांतदेखील मूर्ती विसर्जित करण्यात आल्या.
218 निर्माल्य कलशांची व्यवस्था करण्यात आली होती.

अकोला

शहरातील मोरणा नदीपात्रात पुरेसे पाणी नसल्याने महापालिकेने पात्रातच एका ठिकाणी कृत्रिम टाके तयार करुन विसर्जन करण्यात आले. तिथेच निर्माल्य संकलनही करण्यात आले. गांधीग्राम, अंदुरा येथेही पूर्णा नदीपात्रात विसर्जन झाले. तेथे काही प्रमाणात मंडळांनी मिर्माल्य पाण्यात टाकले.

औरंगाबाद

1200 सार्वजनिक गणेश मंडळे होते. आठ ठिकाणी गणेश विसर्जन. प्रत्येक ठिकाणी निर्माल्य संकलन करण्यात आले.

25-30 टन सर्वाधिक निर्माल्य जि.प.त जमा झाले.

60-65 टन निर्माल्य संकलन शहरभरात झाले.

3000 शाडू मातीच्या गणेशमूर्तींची घरात प्रतिष्ठापना करण्यात आली होती.

5,00,000 प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींची औरंगाबाद शहरातील घरांमध्ये प्रतिष्ठापना करण्यात आली होती. सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये ९९ टक्के गणेशमूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसचेच बसविण्यात आले होते.

Eight Tonne Nirmalya Collections at Chalisgaon | चाळीसगावला आठ टन निर्माल्य संकलन

नागपूर

300 कृत्रिम टॅँक नागपूरच्या वस्त्यांत, चौकांमध्ये मनपाद्वारे तयार केले होते. प्रत्येक टॅँकजवळ एक असे ३०० निर्माल्य कलश. नागपूर शहरात केवळ फुटाळा तलावावर विसर्जनाची परवानगी. उर्वरित पाच तलावांजवळ कृत्रिम टॅँकची व्यवस्था होती.

12000 सार्वजनिक गणपती तर १ ते सव्वा लाख घरघुती गणपतींचे फुटाळा तलावात यावर्षी विसर्जन करण्यात आले.

350 टन निर्माल्य शहराच्या सर्व भागातून जवळपास गोळा करण्यात आले. फुटाळा तलावातून शेवटच्या दिवशी ५० टनांच्यावर निर्माल्य गोळा करण्यात आले. मात्र २ ते ३ टन निर्माल्य तलावात फेकण्यात आले.

03 लक्ष घरघुती गणपतींची स्थापना नागपूर शहरात करण्यात आली होती. त्यात १ लाख ८० हजार मातीचे तर १ लाख २० हजार पीओपी मूर्तींचा समावेश होता.

सातारा

10 ठिकाणी शहरात विसर्जन करण्यात आले. यातील संगम माहुली याठिकाणी निर्माल्य पाण्यातच टाकण्यात आले. उर्वरित ९ ठिकाणी नगरपालिकेने व्यवस्था केली होती.

670 किलो निर्माल्य माहुलीत पाण्यात मिसळले. सुमारे १००० किलो निर्माल्य पाण्यापासून दूर राहिले.

13 गणेशोत्सव मंडळांनी पर्यावरणासाठी कायस्वरूपी फायबरची मूर्ती बसवली आहे.

निर्माल्य तलावात पडल्यानंतर ते सडल्यामुळे अनएरोबिक स्थिती निर्माण होते व पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. तलावात प्रतिलिटर ६ मिलिग्रॅम ऑक्सिजनचे प्रमाण आवश्यक आहे. मात्र ते ४ ते ४.५ मिलिग्रॅम/ लिटरपर्यंत असते. विसर्जनानंतर हा स्तर २.५ मिलिग्रॅम/लिटरवर येतो. त्याखाली गेले तर तलावातील इकोसिस्टीम नष्ट होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे हे निर्माल्य तलावात जाता कामा नये.

- कौस्तुभ चटर्जी, ग्रीन व्हिजील, नागपूर

मुंबईकरांनी विसर्जनावेळी बऱ्यापैकी नियम पाळले. १२१ डेसिबल ही सर्वात शेवटची पातळी असून, ठिकठिकाणी वाद्यवृंदाचा आवाज कमी राहील, याची खबरदारी घेतली आहे.

- सुमेरा अब्दुलाअली, आवाज फाऊंडेशनच्या सर्वेसर्वा

 

Web Title: Ganesh Festival 2019 Plaster of Paris preferred across the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.