Ganesh Festival 2019 : श्री गणेश विसर्जनानंतर नागरिकांची कर्तव्ये!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 09:41 AM2019-09-12T09:41:38+5:302019-09-12T09:44:54+5:30

विसर्जनाची मिरवणूक रस्त्याने जाताना अनेक नागरिक आपल्या मूर्ती विसर्जनासाठी ट्रकमध्ये देतात.

Ganesh Festival 2019 : After the immersion of Shri Ganesh, the duties of the citizens! | Ganesh Festival 2019 : श्री गणेश विसर्जनानंतर नागरिकांची कर्तव्ये!

Ganesh Festival 2019 : श्री गणेश विसर्जनानंतर नागरिकांची कर्तव्ये!

googlenewsNext

- सुजाता देशपांडे

जळगाव : गणेश स्थापनापूजन हे सर्वत्र उत्साहात पार पडते. विसर्जनाच्या मिरवणुकीतही जल्लोष असतो. हे सर्व पार पडल्यावर शहराचे रंगरूप बरेच बदलते. पाहुणा गेल्यावर घरात पसारा असतो. तसेच शहराचेही स्वरूप असते; पण नागरिकांनी जबाबदारी घेतली तर शहर लवकर पूर्वस्थितीत येऊ शकते.

विसर्जनाची मिरवणूक रस्त्याने जाताना अनेक नागरिक आपल्या मूर्ती विसर्जनासाठी ट्रकमध्ये देतात. मूळ मूर्तीची आणि आलेल्या मूर्तींची फुले, हार, दूर्वा रस्त्यांवर पडतात. शिवाय उत्सव संपल्यावर मंडप तोडले जातात. दहा दिवस जनता दर्शनासाठी गर्दी करते. मोठ्या प्रमाणावर हार, दूर्वा, फुले त्या-त्या मंडपाजवळ पडलेले असतात. हे सर्व नागरिकांनी निदान आसपासचे तरी गोळा करावे, अशी फुले, दूर्वा आपापल्या बागेत टाकून जमिनीत जिरवावी. शक्य नसेल तर मनपाच्या निर्माल्य कलशात टाकावे. यामुळे स्वच्छता व भावनांचा सन्मान दोन्ही होईल.

रस्त्यावर गुलालही मुबलक प्रमाणात असतो. आपल्या परिसरातील गुलाल गोळा करून मनपाच्या गाडीत टाकला तर खूपच मोठी देशसेवा होईल. विसर्जनाच्या ठिकाणी प्लास्टिकच्या अनेक सजावटी वस्तू पसरलेल्या असतात. त्या गोळा करून मनपाच्या कुंडीत टाकाव्यात. 

गणेशोत्सवात प्लास्टिकचा वापर तर करायलाच नको. मात्र, जर होत असेल तर विसर्जनावेळी झालेली सर्व घाण ही साफ केलीच पाहिजे, तसेच प्लास्टिक नदीत जाणार नाही याची काळजीदेखील घेतली पाहिजे. 
गणेशोत्सव हा मांगल्याचा उत्सव आहे, त्याचे मांगल्य टिकवून ठेवण्यासाठी पर्यावरणाचा -हास होणार नाही याची काळजी घेणे ही सर्व भक्तांची जबाबदारी आहे. 

विसर्जनाच्या ठिकाणी... : जिथे विसर्जन होते तिथे नागरिकांच्या सहकार्याची खूपच आवश्यकता आहे. या ठिकाणी नागरिकांनी गट करून विसर्जनाच्या ठिकाणी नारळ, नारळाच्या कवट्या, शेंड्या इतरत्र पसरलेल्या असतात. नारळाचे खोबरे काढून तलावात टाकले तर हे खोबरे माशांना अन्न म्हणून उपयोगी ठरते.  कुंकू व हळदीपासून तयार झालेल्या अक्षता पाण्यात टाकल्यास पाण्याचे प्रदूषण होते. त्यामुळे गणेशभक्तांनी हे टाळायला हवे. 



घंटागाड्यांचा वापर करावा
गणेशभक्तांनी निर्माल्य तलावात किंवा नदीत टाकू नये. रस्त्याच्या कडेला सजावटीचे प्लास्टिक सामान, मिरवणुकीतील भक्तांचे पाणी प्यायचे पेले, प्रसादाच्या वाट्या या गोष्टी गोळा करून मनपाच्या घंटागाडीतच टाकाव्यात.



आरोग्यासाठी घातक !
गुलालाचे कण येणाऱ्या वाहनांमुळे आणि हवेमुळे वातावरणात पसरतात यामुळे श्वसनाद्वारे शरीरात जाऊ शकतात जे आरोग्यासाठी घातक आहे. 

(लेखिका जळगाव येथील भारती पर्यावरण प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आहेत.)

Web Title: Ganesh Festival 2019 : After the immersion of Shri Ganesh, the duties of the citizens!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.