ऐन मध्यावर बदलला निवडणुकीचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2024 07:44 AM2024-05-15T07:44:24+5:302024-05-15T07:45:57+5:30

"चारसौ पार"च्या दणदणाटाने सुरू झालेल्या निवडणुकीचा कल बदलला आहे. विरोधी पक्षांपेक्षा अधिक जोमाने जनताच भाजपला टक्कर देते आहे.

trend of elections changed in the middle of lok sabha election 2024 | ऐन मध्यावर बदलला निवडणुकीचा कल

ऐन मध्यावर बदलला निवडणुकीचा कल

योगेंद्र यादव, राष्ट्रीय संयोजक, भारत जोडो अभियान

चौथ्या टप्प्याचे मतदानही संपले. एकूण सातपैकी चार टप्पे पार पडले. निम्म्याहून अधिक जागांवरची निवडणूक पार पडलेली आहे. या निवडणुकीचा कल रोजच्या रोज बदलत चालला आहे. "चारसौ पार"च्या दणदणाटाने सुरू झालेल्या या निवडणुकीचे रूपांतर आता अटीतटीच्या लढतीत झाले आहे. विरोधी पक्षांपेक्षा अधिक जोमाने खुद्द जनताच भाजपला टक्कर देऊ लागली आहे. 'चारसौ पार'ची धुंदी उतरल्यावर आता 'तीनसौ पार'चा जोमही उरलेला नाही. भाजप स्वबळावर २७२ तरी पार करू शकेल का, हा प्रश्न आहे. मित्रपक्ष जमेस धरून तरी भाजपच्या पदरात पूर्ण बहुमत पडू शकेल का, असाही प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

या निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच मी लिहिले होते की, सत्ताधीशांच्या दाव्यांकडे फारसे लक्ष देऊ नका, भाजप २७२च्याही खाली येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यावेळच्या भारलेल्या वातावरणात माझ्‌या या विधानाकडे लोकांनी मुळीच लक्ष दिले नाही. निवडणुकीच्या संदर्भात मी देशाचे तीन भाग कल्पिले होते. ओरिसापासून ते केरळपर्यंतच्या किनारपट्टीत भाजपच्या मतांची टक्केवारी वाढणे शक्य होते. परंतु, त्या प्रमाणात त्यांच्या जागा न वाढू देणे कठीण नव्हते. या प्रदेशात भाजपला पूर्वीपेक्षा जास्तीत जास्त दहाच जागा अधिक मिळू शकत होत्या, उलट गुजरातसह उत्तर आणि पश्चिमेच्या हिंदी पट्टधात भाजपला जवळपास सगळ्या जागा मुळीच मिळू न देणे अगदीच शक्य होते. योग्य रणनीती बनवून यापैकी प्रत्येक राज्यात भाजपकडून दोन-चार जागा सहज खेचून घेता येतील. तिसऱ्या म्हणजेच मधल्या पट्ट्यातील कर्नाटक, महाराष्ट्र, विहार आणि बंगाल या राज्यांत भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष यांचे मोठे नुकसान होणे अपरिहार्य होते. या चार राज्यांत भाजपला दहा-दहा जागा जरी कमी मिळाल्या तरी भाजप २७२ च्या खाली जाऊ शकेल, असे माझे प्रारंभीचे अनुमान होते.

आता चार टप्पे संपलेले असताना हे गणित ताडून पाहण्याची आवश्यकता आहे. प्राप्त झालेल्या ताज्या संकेतांनुसार, मोठा बदल होऊ शकणाऱ्या राज्यांच्या यादीतून बंगालचे नाव आता वगळावे लागेल. काँग्रेस आणि तृणमूल यांची आघाडी न होणे, मुस्लिम मतांच्या विभाजनाची शक्यता आणि संदेशखलीसारख्या घटनांमुळे खूप जागा गमावण्याच्या आपत्तीतून भाजपची आता सुटका झाली आहे. भाजप पूर्वीच्या अठरा जागांच्या जवळपास पोहोचू शकेल, असे दिसते.

इतरत्र मात्र भाजपची अवस्था आज पूर्वीपेक्षा कठीण झाल्याचे दिसते आहे. कर्नाटकात भाजपला मोठे यश मिळण्याची शक्यता नाही. काँग्रेस यावेळी निम्म्या जागा जिंकण्याचा दावा करत आहे. यात काही कसर उरलीच असेल तर ती प्रज्वल रेवण्णा कांडामुळे भरून निघाली आहे. महाराष्ट्रातील स्पर्धेत प्रत्यक्ष भाजपची परिस्थिती चांगली आहे. पण, शिवसेनेचा मतदार मुख्यमंत्री शिंदे यांच्या पक्षाला खरी शिवसेना मानायला मुळीच तयार नाही, राष्ट्रवादीचा मतदारही शरद पवार यांची साथ सोडायला तयार दिसत नाही. गेल्या वेळी येथे भाजप आणि मित्रपक्षांना मिळून ४८ पैकी ४२ जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यांच्या १२ ते १५ जागा कमी होतील, असा सगळ्याच निरीक्षकांचा अंदाज आहे. बिहारमध्ये भाजपपेक्षा त्याच्या मित्रपक्षांचे नुकसान जास्त होत असल्याचे दिसते. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालचे महागठबंधन अधिक संघटित आहे. नितीश कुमार यांचे राजकारण आता उतरणीला लागले आहे. गेल्या वेळी ४० पैकी ३९ जागी विजयी झालेली रालोआ यावेळी २५-३० च्या पलीकडे जाईल असे वाटत नाही.

गेल्या दोन्ही निवडणुकीत राजस्थानात भाजपने सर्वच्या सर्व २५ जागा जिंकल्या होत्या. (त्यापैकी एक जागा गेल्यावेळी मित्रपक्षाला मिळाली होती.) परंतु यावेळी राज्यात अटीतटीची लढत आहे. भाजपच्या तुलनेत काँग्रेसने तिकीट वाटपही अधिक शहाणपणाने केले आहे. शिवाय राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी, सीपीएम आणि भारत आदिवासी पक्ष यांच्याशी निवडणूक समझोते करून आपली राजकीय शहाणीव प्रकट केली आहे. याही राज्यात भाजपला आठ-दहा जागा गमावाव्या लागतील असे दिसते.

उत्तर प्रदेशात जयंत चौधरी यांच्या राष्ट्रीय लोकदलाबरोबर हातमिळवणी करूनही पहिल्या दोन टप्प्यात भाजपची कामगिरी अपेक्षेनुसार झालेली नाही. गेल्या वेळी निव्वळ स्वतःच्या ६२ आणि मित्रपक्षांसह ६४ जागा जिंकणाऱ्या भाजपची संख्या यावेळी वाढण्याऐवजी कमीच होणार, हे नक्की.

याचा अर्थ, या निवडणुकीच्या ऐन मध्यावर वरील पाच राज्यांत भाजप आणि मित्रपक्षांच्या मिळून प्रत्येकी किमान दहा-दहा जागा कमी होतील, असे दिसते. गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, हरयाणा आणि दिल्ली या सर्व राज्यांत मिळून किमान १० जागा कमी होतील. त्यामुळे किनारपट्टीच्या प्रदेशात जो काही फायदा होईल तो शून्यावर येईल. हे गणित बरोबर असेल तर भाजपला २७२ चा आकडा स्वबळावर गाठता येईल अशी चिन्हे दिसत नाहीत. उरलेल्या टप्यात हीच हवा कायम राहिली तर भाजप आपल्या मित्रपक्षांची कुमक घेऊनही निर्विवाद बहुमत गाठू शकणार नाही अशीच शक्यता जास्त वाटते.
yyopinion@gmail.com

 

Web Title: trend of elections changed in the middle of lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.