सत्ता की निष्ठा ?

By सचिन जवळकोटे | Published: November 24, 2019 06:52 AM2019-11-24T06:52:27+5:302019-11-24T06:55:20+5:30

लगाव बत्ती

Loyalty to power? | सत्ता की निष्ठा ?

सत्ता की निष्ठा ?

Next

- सचिन जवळकोटे

देवेंद्रपंतांनी प्रभातसमयी शपथ घेतली, हे तितकं महत्त्वाचं नसावं. ‘मातोश्री’वरची स्वप्नं अखेर पहाटेचीच ठरली, हेही अधिक चिंताजनक नसावं. ‘घड्याळ’वाल्यांची फाळणी झाली, हेही तसं आश्चर्यकारक नसावं...कारण ‘बारामतीचं घराणं फुटलंं’ यापेक्षा धक्कादायक ब्रेकिंग न्यूज सोलापूरकरांसाठी दुसरी कुठलीच नसावी. ‘दादा की काका’ या भयंकर पेचात सापडलेल्या कार्यकर्त्यांसाठी ‘सत्ता की निष्ठा’    या प्रश्नाच्या उत्तराची शोध मोहीम भलतीच त्रासदायक असावी.

भारतनाना अन् बबनदादां’च्या

परिपक्वतेचा लागणार कस !

सोलापूर जिल्हा हा ‘बारामती’ घराण्याचा लाडका बालेकिल्ला. इथले किल्लेदारही इतके ‘बारामतीनिष्ठ’ की अनेक दशकं इथल्या किल्ल्यांच्या चाव्याही ‘काकां’च्याच तिजोरीत राहिलेल्या. आपापल्या तालुक्यात सरंजामशाही पद्धतीनं राज्य करणारे कैक संस्थानिकही ‘थोरले काका बारामतीकर’ यांच्यापुढे आदरयुक्त भीतीपोटी नेहमीच वाकून झुकलेले; मात्र याच ‘बारामती’च्या ‘धाकट्या दादां’चं पार्टीत जसंजसं वर्चस्व वाढत गेलं, तसतसं जिल्ह्याच्या राजकारणालाही फुटत गेले तीक्ष्ण काटे. या ‘दादां’पायीच गेल्या काही वर्षांत लागली इथल्या बालेकिल्ल्याची पुरती वाट.

‘अकलूज’च्या ‘दादा ग्रुप अँड प्रायव्हेट कंपनी’ विरोधात ‘दादा बारामतीकरां’नी ज्यांना-ज्यांना ताकद दिली, ते थेट ‘देवेंद्रपंतां’च्या सान्निध्यात रमले. हे कमी पडलं की काय म्हणून ‘अकलूजकर’ही एक दिवस ‘चंदूदादां’च्या मध्यस्थीनं सत्तेच्या ‘वर्षा’वात न्हाऊन निघाले.

आतातर हे तिन्ही ‘दादा’ एकाच पंगतीला येऊन बसलेत. दादा अकलूजकर, दादा बारामतीकर अन् दादा कोल्हापूरकर. अशा परिस्थितीत बिच्चाऱ्या माढ्याच्या ‘दादा निमगावकरां’नी काय निर्णय घ्यावा, हे आता भीमा खोऱ्यातलं लहान लेकरूही सांगू शकतं. बंधू ‘संजयमामा’ अगोदरच सत्तेच्या कळपात सामील झालेत. ते थोडंच मोठ्या भावाला वाºयावर सोडून देतील ? कदाचित या बंडाची कुणकुण लागली होती की काय ‘बबनदादां’ना...कारण निकालानंतर ते ‘बारामती’च्या ‘धाकट्या दादां’सोबतच अधिक जनतेला दिसलेले. 

पंढरपूर’मध्येही ‘भारतनानां’ची अवस्था या क्षणी ‘आगीतून फुफाट्यात’सारखी बनलेली. ‘हात’वाल्यांच्या माध्यमातून सत्ता मिळण्याची शक्यता खूप कमी, हे लक्षात येताच त्यांनी प्लॅटफॉर्म बदललेला. वाट पाहूनही ‘लोटस् एक्सप्रेस’ न मिळाल्यानं ते अखेर ‘क्लॉक पॅसेंजर’मध्ये बसलेले. सुदैवानं ही गाडी भलतीच सुपरफास्ट निघाली. ‘भारतनाना’ चक्क ‘हॅट्ट्रिक आमदार’ बनले. गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून ‘वाघानं हातात घड्याळ’ बांधल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर तर त्यांचे कार्यकर्तेही पंढरीच्या गल्ली-बोळातून ‘लाल बत्ती’ची गाडी धावताना स्वप्न पाहू लागले.
पण हाय...‘बत्ती’ तर सोडाच, साधं सत्तेच्या प्रवाहात तरी राहतो की नाही, अशी परिस्थिती आज निर्माण झालीय. त्यामुळं दरवेळी ‘चिन्ह’ बदलण्यात माहीर असलेले ‘नाना’ आता कदाचित थेट ‘नेता’च बदलण्यात तयार झाले तर आश्चर्य वाटायला नको. लगाव बत्ती.

संजयमामां’ची पाचंही बोटं तुपात बुडाली !

गेल्या काही वर्षात सर्वाधिक गोची कुणाची झाली असेल तर ‘निमगाव’च्या ‘संजयमामां’ची...एकीकडं ‘अजितदादां’शी दोस्ती, तर दुसरीकडं ‘देवेंद्रपंतां’कडं ओढा. या कुचंबणेतूनच लोकसभेला पराभूत उमेदवाराचा शिक्का मारून घेतलेला; मात्र विधानसभेला दोन्ही नेत्यांनी ‘आतून’ चांगलीच साथ दिली. त्यामुळंच ‘मामा’ अखेर ‘आमदार’ बनलेले. गेल्या महिन्याभरात सत्ता कुणाची येणार याची स्पर्धा सुरू झालेली. कधी ‘कमळ’ तर कधी ‘घड्याळ’चा सापशिडीचा खेळ रंगलेला. अशावेळी ‘संजयमामां’ची धडधड विनाकारण वाढलेली. कारण त्यांना जेवढे ‘अजितदादा’ हवे होते, तेवढेच ‘देवेंद्रपंत’ही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दोघांपेक्षाही जास्त हवी होती ‘सत्ता’. आतातर दादा मिळाले, पंत मिळाले, सत्ताही मिळाली. ‘मामां’ची पाचंही बोटं तुपात बुडाली. लगाव बत्ती...
काय रावऽऽ काय सांगावं ?

सकाळ-सकाळी ‘पंत’ अन् ‘दादां’नी संमद्यास्नी लय येड्यात काढलं. सोलापुरात तर अनेक नेत्यांचे प्लॅन टोटल फेल गेले. त्यातल्या चार प्रमुख घडामोडींची ही अंदाजपंचे ‘गंमतीदार’ झलक...

दोनच दिवसांपूर्वी ‘कुमठ्या’च्या ‘दिलीपरावां’नी ‘जनवात्सल्य’ला फोन केलेला, ‘ताईऽऽ आता मेकअप बॉक्सचा हिशोब ठेवा बाजूला. दहा रुपयांतल्या थाळीवाल्या योजनेत सहभागी व्हा; कारण आपले दोन्ही पक्ष एकत्र सत्तेत येताहेत नां !’ असंही मोठ्या कौतुकानं त्यांनी सांगितलेलं.. पण आता कसलं काय..

‘घड्याळ’वाले ‘संतोषराव’ अन् ‘मनोहरपंत’ सकाळी चक्क अवंतीनगरातल्या ‘पुरुषोत्तम’ना भेटायला निघालेले. ‘आपली सत्ता आली,’ हे सांगत त्यांना मिठाई भरवायची, असं दोघांनीही ठरविलेलं. मात्र मध्ये रस्त्यातच त्यांना ‘अजितदादां’ची धक्कादायक ब्रेकिंग समजली. बिच्चारे ‘मनोहरपंत’ मुकाट्यानं लकी चौकाकडं गेले. ‘संतोषराव’ मात्र मोठ्या उत्साहात दोन्ही ‘देशमुखां’ना भेटण्यासाठी वळले.

मोहोळचे ‘नागनाथअण्णा’ही ‘अनगर’च्या ‘पाटलां’ना भेटलेले. बदलत्या घडामोडींमुळं दोघांचेही चेहरे बदललेले. ‘तुम्ही प्रचंड कष्ट घेऊन आमदार निवडून आणलात. मीही प्रचंड पैसा ओतून घरी परतलो. आता आपल्या दोघांचीही सत्ता येईल म्हणून खूश होतो. जाऊ द्या सोडाऽऽ आपण दोघंही समदु:खी,’ असं म्हणत ‘नागनाथअण्णां’नी ‘पाटलां’ना एक सल्ला दिला, ‘आता आपण बिझनेसकडे लक्ष देऊ या. तुम्ही नक्षत्रचं प्रॉडक्शन वाढवा. मीही विकण्याचं टारगेट वाढवतो.’

अकलूजच्या ‘धैर्यशीलभैय्यां’नी सकाळी ‘रणजितदादां’ना कॉल केलेला, ‘दादाऽऽ एक गूड न्यूज अन् दुसरी बॅड न्यूज. अगोदर कोणती सांगू ?’ तेव्हा अलीकडच्या काळात चांगल्या बातमीसाठी आसुसलेले ‘दादा’ पटकन् म्हणाले ‘अगोदर गुड न्यूज’.. तेव्हा ‘भैय्यां’नी सांगितलं, ‘देवेंद्रपंतांनी सीएम पदाची शपथ घेतली,’ खूश होऊन ‘दादांं’नी विचारलं, ‘आता बॅड काय ?’ तेव्हा ‘भैय्या’ अत्यंत गंभीरपणे उद्गारले, ‘अजितदादांनीही डीसीएम पदाची शपथ घेतली.’ फोन कट.. लगाव बत्ती...

(लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

Web Title: Loyalty to power?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.