ठाकरे ब्रँड खरेच संपला का? भाजप-शिंदे सेनेसमोर आगामी काळात तगडे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 06:34 IST2026-01-19T06:33:28+5:302026-01-19T06:34:34+5:30

महापालिका स्तरावरील नेते गेले तरी जिवाला जीव देणारा निष्ठावंत सामान्य शिवसैनिक अजून सोबत आहे. 

Editorial on Thackeray Brand Endures Resilient Fightback Despite BMC Election Setback | ठाकरे ब्रँड खरेच संपला का? भाजप-शिंदे सेनेसमोर आगामी काळात तगडे आव्हान

ठाकरे ब्रँड खरेच संपला का? भाजप-शिंदे सेनेसमोर आगामी काळात तगडे आव्हान

मुंबई महापालिका निवडणुकीतील भारतीय जनता पक्ष व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा विजय आणि मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंची पीछेहाट निर्विवादपणे ऐतिहासिक आहे. तथापि, एवढ्याने ठाकरे ब्रँड संपला, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना व राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपली, असे म्हणणे घाईचे राजकारण आहे. एका निवडणुकीने कोणाचेही राजकारण संपत नाही, ना ते तेवढ्याने उभे राहते. तेव्हा, या निवडणुकीच्या निमित्ताने असा अंतिम निष्कर्ष काढायला नको. उलट, या निकालाने एका नव्या राजकीय लढाईची, त्याभोवती फिरणाऱ्या राजकारणाची सुरुवात मुंबई महानगर परिसरात झाली असे म्हटले तरी चालेल. मुळात उद्धव व राज यांचा पराभव दारूण, नामुष्कीजनक नाही. ही पीछेहाट सन्मानजनक आहे. निकालावरील पहिल्या प्रतिक्रियांमध्ये दोघांनीही म्हटल्याप्रमाणे मुंबई, तसेच या महानगरात राहणाऱ्या मराठी माणसांच्या हक्कांसाठी लढण्यापुरती ताकद दोघांनाही मतदारांनी दिली आहे. विशेषत: प्रतिकूल परिस्थितीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मिळविलेले यश अधिक लक्षणीय आहे.

मनसेचे अपयश थोडे अधिक वाटत असले तरी त्याचे कारण, गेल्या बारा वर्षांमध्ये म्हणजे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून दरवेळी मतदारांपुढे जाताना राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षासंबंधी बदललेल्या भूमिकांमध्ये आहे. आधी गुजरात माॅडेलचे जाहीर काैतुक, नंतर ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत टीका, नंतर पुन्हा साथ आणि शेवटी काडीमोड अशा भूमिका ते बदलत गेले. मराठी भाषेच्या मुद्द्यावर अखेर त्यांना सूर गवसला आणि ठाकरे बंधूंच्या एकीचा क्षण अवतरला. मतदारांवर या कोलांटउड्यांचा नक्कीच उलटा परिणाम झाला असणार. म्हणूनच त्यांना पुन्हा पुन्हा ‘आम्ही कायम एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलो आहोत’ हे सांगावे लागत आहे. असो. अर्थात, दीर्घकालीन राजकारणाचा विचार करता एक मुद्दा यापेक्षा वेगळा आहे. 

शक्तिशाली विरोधकाला कमकुवत प्रतिस्पर्ध्याने ललकारणे, त्याच्याविरुद्ध ठामपणे उभे राहणे नेहमीच सामान्यांना आवडते. सामान्य माणूस अशा आव्हानवीराच्या पाठीशी उभा राहतो. महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करता २०१४ च्या विधानसभा निवडणुकीचे उदाहरण ताजे आहे. भगवी युती म्हणून लोकसभा निवडणुकीत तब्बल ४१ जागांवर यश मिळविणारे भाजप व शिवसेना विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढले. भाजपच्या महाकाय आव्हानापुढे उद्धव ठाकरे उभे राहिले आणि मतदारांनी त्यांचे ६३ आमदार निवडून आणले. तितके यश शिवसेनेला त्यानंतर युती करूनदेखील मिळाले नाही. आता महापालिका निवडणुकीत तर जवळपास दोन दशकांचा दुरावा मागे टाकून उद्धव व राज हे बंधू एकत्र आले होते. मराठी भाषा, मराठी बाणा, मराठी माणूस हा भाऊबंधनाचा धागा होता. याच मुद्द्यावर त्यांनी मतदारांना साद घातली आणि मुंबईतील मराठीबहुल भागातील निकालाचे तपशील बारकाईने तपासले तर म्हणता येईल की, मतदारांनीही त्यांना भरभरून प्रतिसाद दिला. दादर, वरळी, लालबाग, शिवडी अशा जुन्या गिरणगावांतील मराठी मतदार ठाकरे बंधूंच्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळेच मूळ पक्ष गेला, जनमानसात रूजलेले निवडणूक चिन्ह गेले, बहुतांश माजी नगरसेवक सोडून गेले, साधनांची वानवा, प्रतिस्पर्धी तगडा व संसाधनांनी सुसज्ज अशी सगळी प्रतिकूल परिस्थिती असतानाही उबाठा शिवसेना व मनसे या दोन्ही भावांच्या पक्षांनी लक्षणीय यश मिळविले. अर्थातच, हे यश बृहन्मुंबई महापालिकेची सत्ता कायम ठेवण्यासाठी पुरेसे नाही. जवळपास तीस वर्षांची सत्ता हातातून जाण्याची स्थिती उद्भवली आहे. तरीदेखील ठाकरे बंधूंना समाधान हेच असेल की, अगदी महापालिका स्तरावरील नेते गेले तरी जिवाला जीव देणारा निष्ठावंत सामान्य शिवसैनिक अजून सोबत आहे. 

कोणत्याही राजकीय पक्षाची खरी ताकद कार्यकर्ता हीच असते. उद्धव यांचे शिवसैनिक व राज यांचे मनसैनिक यांच्या रूपातील ही ताकद दोन्ही पक्षांना पुढची लढाई लढण्यासाठी उमेद देत राहतील. मुंबईकरांनी ज्यांच्या हाती सत्ता दिली आहे त्या भाजप व शिंदेंच्या सेनेपुढे या उमेदीचा दबाव आणि आव्हानदेखील मोठे असेल. हिंदुत्व आणि मराठी अस्मिता यात समन्वयाची कसरत त्यांना सतत करावी लागेल. धार्मिक व भाषिक ध्रुवीकरणाने इतके टोक गाठले आहे की, उद्धव व राज यांच्या नगरसेवकांना, सैनिकांना रोज नवे मुद्दे मिळत राहतील. एकंदरीत लढाई आता कुठे सुरू झाली आहे.
 

Web Title : क्या ठाकरे ब्रांड खत्म? भाजपा-शिंदे सेना के लिए कड़ी चुनौती।

Web Summary : झटकों के बावजूद, ठाकरे ब्रांड खत्म नहीं हुआ है। मराठी पहचान पर एकजुट होकर, वे मतदाता समर्थन बनाए रखते हैं, जिससे भाजपा-शिंदे की सेना के लिए चुनौती पेश होती है। लड़ाई अभी शुरू हुई है।

Web Title : Thackeray Brand Over? BJP-Shinde Sena Face Tough Challenge Ahead.

Web Summary : Despite setbacks, the Thackeray brand isn't finished. United on Marathi identity, they retain voter support, posing a challenge to BJP-Shinde's Sena. The fight has just begun.