संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 08:43 IST2025-12-26T08:42:54+5:302025-12-26T08:43:13+5:30
ठाकरेबंधूंच्या युतीची चर्चा गेले काही महिने सुरू असताना राजकारणात ‘ठाकरे ब्रॅण्ड’ नाही, असे भाजपचे नेते बोलत होते. मात्र आता ठाकरेबंधूंची युती झाल्यावर दोन्हीकडील सैनिकांचा दुणावलेला आत्मविश्वास पाहून भाजपच्या मनात भीतीची पाल चुकचुकली आहे.

संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
शिवाजी पार्कवरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर उद्धव व राज ठाकरे, दोन्ही सुना व नातवंडे यांना एकत्र नतमस्तक होताना पाहून बाळासाहेब गहिवरले असतील. १९ वर्षांनंतर पुलाखालून इतके पाणी वाहून गेल्यावर का होईना ‘तुटू नका, फुटू नका, मराठीचा वसा टाकू नका’, याची जाणीव या साऱ्यांना झाली याचा कोण आनंद बाळासाहेबांना झाला असेल. उद्धव व राज ठाकरे यांनी विभक्त होऊ नये हीच बाळासाहेबांची इच्छा होती. राज यांच्या राजकीय काडीमोडानंतर २००९च्या निवडणुकीत ‘उद्धव, आदित्य यांना सांभाळून घ्या’, असे आर्जव करणारे बाळासाहेब पाहिल्यावर कडव्या शिवसैनिकांना ‘हे दोघे एकत्र का येत नाहीत?’ अशी चुटपुट लागली होती. काहींनी हे दोघे एकत्र यावे याकरिता मोहीम उघडली. काहींनी अनवाणी चालण्याच्या शपथा घेतल्या.. परंतु पहिली टाळी कुणी कुणाला द्यायची, असा अहंकाराचा मुद्दा उत्पन्न झाला. निवडणूक प्रचारात कौटुंबिक उणीदुणी काढण्यापर्यंत दोघांनी मजल गाठली. दोन्हीकडील ‘सैनिक’ नेत्यांना खुश करण्याकरिता बाह्या सरसावून एकमेकांच्या अंगावर गेले, एकमेकांवर नारळ भिरकावून डोकी फोडून बसले. छगन भुजबळ यांच्यापासून नारायण राणेंपर्यंत अनेकांनी शिवसेना सोडली तेव्हा पक्षात मोठी फूट पडली नाही. केंद्रातील भाजपच्या महाशक्तीचा आशीर्वाद लाभलेल्या एकनाथ शिंदे यांनी मात्र शिवसेनेतील नेते, पदाधिकारी अक्षरश: खरवडून नेले. त्यामुळे उद्धव यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. राज यांनी मनसे स्थापन केली खरी; पण तिची घट्ट बांधणी करण्यात ते कमी पडले. राजकारण व भूमिकेत सातत्य नसल्याने त्यांनाही अनेक सहकारी सोडून गेले. साहजिकच राज यांच्याही भवितव्यापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे दोघा बंधूंना अखेर प्रीतिसंगमात उडी ठोकणे अपरिहार्य झाले. तो मुहूर्त बुधवारी साधला.
महापालिका निवडणुकीत दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. याची घोषणा राज यांनी केली हे विशेष ! कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, असे उद्धव म्हणाले. ठाकरेबंधूंच्या युतीची चर्चा गेले काही महिने सुरू असताना राजकारणात ‘ठाकरे ब्रॅण्ड’ नाही, असे भाजपचे नेते बोलत होते. मात्र आता ठाकरेबंधूंची युती झाल्यावर दोन्हीकडील सैनिकांचा दुणावलेला आत्मविश्वास पाहून भाजपच्या मनात भीतीची पाल चुकचुकली आहे. एकनाथ शिंदे ठाण्यात आणि राज व शिंदे ही डबलबॅरल गन मुंबईत उद्धव यांच्यावर रोखून महापालिका त्यांच्या हातून स्वबळावर हिसकावून घ्यायची, असा भाजपचा डाव होता. परंतु अचानक हे दोघे एकत्र आल्याने मुंबईत भाजपपुढे आव्हान निर्माण झाले. शिवाय शिंदे यांचे महत्त्व अवास्तव वाढले. दिल्लीत कळ फिरवून शिंदे यांनी भाजपला युती करायला भाग पाडले. त्याचे कारण अर्थातच लोकसभेतील तोकडे बहुमत व ठाकरेबंधूंची युती हेच आहे. २०१४ पासून मागील तीन विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचे भव्यदिव्य नेतृत्व पाठीशी असूनही महाराष्ट्रात भाजपला स्वबळावर सत्ता काबीज करता आली नाही. त्याचप्रमाणे महापालिका निवडणुकीतही भाजप दोन जागांनी का होईना शिवसेनेच्या मागे राहिली. भावांचे हे मनोमिलन पुन्हा एकदा भाजपला देशाच्या आर्थिक राजधानीवर कब्जा करण्याच्या मनसुब्यांवर उदक सोडायला लावणार, अशी चिन्हे दिसतात.
मुंबईतील मराठी व मुस्लीम मतदारांवर या युतीची भिस्त असेल. मुंबईसह महाराष्ट्रातील उच्च मध्यमवर्ग हा खरे तर शिवसेनेचा लाभार्थी आहे. मराठी माणसाला बँका, एलआयसी, एअर इंडिया वगैरे आस्थापनांत नोकऱ्या मिळाव्या याकरिता शिवसेनेने संघर्ष केल्याने आज त्यांच्या घरातील मुले-नातवंडे अमेरिका, ऑस्ट्रेलियात सुखनैव जगत आहेत. बाळासाहेबांच्या उपकारातून उतराई होण्याची हीच संधी आहे हा संदेश ठाकरेबंधूंनी या वर्गापर्यंत पोहोचवला व मुंबईतील गरीब, मध्यमवर्गीय मराठी माणसे जागा विकून उपनगरात फेकली जाण्याचा सध्याचा वेग कमी केला तरी मुंबई राखणे त्यांना शक्य आहे. महाविकास आघाडीला सुरुंग लावण्याकरिता भाजपनेच राज यांना तिकडे पाठवले, अशी टिमकी भाजपचे काही नेते वाजवत आहेत. निवडणूक प्रचारात आपण बरेच व्हिडिओ लावणार असल्याचे राज यांनी सांगितले आहे. निवडणुकीनंतर सत्तेच्या छोट्या तुकड्याचा मोह टाळायची तयारी राज यांनी ठेवली पाहिजे. कारण ठाकरेबंधूंच्या युतीपुढील लढाई छोटी व लवकर संपणारी नाही. अन्यथा ही युती अळवावरचे पाणी ठरेल. दोन्हीकडील मतदारांचा विश्वासघात ठरेल आणि बाळासाहेबांच्या स्मृतीशी केलेली प्रतारणाही ठरेल.