उचलली जीभ लावली टाळ्याला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 04:35 IST2026-01-07T04:35:15+5:302026-01-07T04:35:15+5:30
रवींद्र चव्हाण यांनी थेट विलासरावांच्या कर्मभूमीत, त्यांच्या आठवणी पुसून टाका, असे सांगण्याचे धाडस केले.

उचलली जीभ लावली टाळ्याला
काही वर्षांपूर्वी झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना, ‘बाळासाहेब ठाकरे यांच्यावेळी असणारी शिवसेना आता राहिलेली नाही,’ असे विधान केले होते. त्यावरून मुंबईत शिवसैनिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली. शिवसैनिकांनी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करत ती निवडणूक शिवसेनेला जिंकून दिली. त्या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला.
‘अजित पवार यांनी धरणात पाणी नाही...’ या प्रश्नावर वादग्रस्त विधान केले होते. त्यावरून त्यांना उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. प्रत्येक विभागाची, जिल्ह्याची काही श्रद्धास्थाने असतात. ठाणे जिल्ह्यात रामभाऊ म्हाळगी किंवा रामभाऊ कापसे यांच्याविषयी कोणीही अपशब्द ऐकून घेणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी महाराष्ट्रात कोणी अपशब्द खपवून घेणार नाही. त्यातही जे नेते हयात नाहीत त्यांच्याविषयी बोलताना सभ्यतेचा संस्कार महाराष्ट्रावर आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तो मोडला. लातूर येथे झालेल्या सभेत बोलताना उत्साहाच्या भरात ‘लातूर जिल्ह्यातून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसून टाकल्या जातील’ असे विधान त्यांनी केले. त्यावर तीव्र असंतोष उमटताच लगोलग दिलगिरीही व्यक्त केली. हे नंतर सुचलेले निरर्थक शहाणपण. ‘पार्टी विथ डिफरन्स’ असे घोषवाक्य मिरविणाऱ्या भाजप नेत्यांना संस्कार आणि संस्कृती या गोष्टी शिकवायची गरज खरेतर नसावी; पण सर्वदूर मिळणाऱ्या विजयाच्या पताका फडकत असताना ज्याचे-त्याचे भान हरपायला लागलेले दिसते. रवींद्र चव्हाण यांनी थेट विलासरावांच्या कर्मभूमीत, त्यांच्या आठवणी पुसून टाका, असे सांगण्याचे धाडस केले.
महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांनी पक्षीय भेदाभेद विसरून मैत्र जपण्याचे काम कायमच केले आहे. आपापल्या पक्षांचे झेंडे बाजूला ठेवून एकमेकांच्या सुख-दुःखात, राजकीय सत्कार समारंभात महाराष्ट्रातले नेते सहभागी झाल्याची असंख्य उदाहरणे आहेत. विधान भवनात एकमेकांच्या विरोधात टोकाला जाऊन बोलणारे नेते, विधानसभा, विधानपरिषदेच्या लॉबीत एकमेकांच्या भाषणाचे कौतुक करतानाचा, एकमेकांनी आणलेले डबे खातानाचा इतिहास ताजा आहे. रवींद्र चव्हाण यांच्या विधानाने या इतिहासाला गालबोट लागले, हे नक्की. अलीकडे एकमेकांची टिंगलटवाळी करणे, उणीदुणी काढणे यासाठीच राजकीय सभा असतात की काय, असे वाटू लागले आहे.
कोणीही उठतो, वाट्टेल ते बोलतो. त्या बोलण्याच्या क्लिप व्हायरल होतात. असे अनेक व्हायरल नेते विविध पक्षांचे स्टार प्रचारक बनले आहेत. रवींद्र चव्हाण त्या पंक्तीतले नाहीत. मात्र, नको त्या ठिकाणी, नको ते बोल त्यांच्या मुखातून निघाले. कधीकाळी यशवंतराव चव्हाण, जॉर्ज फर्नांडिस, बापू काळदाते, प्रमोद महाजन, विलासराव देशमुख, आर. आर. पाटील यांच्यासारख्या नेत्यांच्या भाषणाला लोक आवर्जून जायचे. बाळासाहेब ठाकरे यांची स्वतःची वेगळी शैली होती. त्यांची भाषणे ऐकायलाही तुडुंब गर्दी होत असे. राज ठाकरे यांची भाषणे इतरांपेक्षा वेगळी असतात. देवेंद्र फडणवीस यांना काय बोलावे यापेक्षा काय बोलू नये, हे चांगले कळते. शरद पवार यांच्या अनेक सभ्य सभा महाराष्ट्राने पाहिल्या आहेत.
राज्यात आजही काही नेते भाषणांमधून स्वतःचा संयम ढळू देत नाहीत. मात्र, इतक्या वर्षांच्या राजकारणानंतरही अनेक नेत्यांना काय बोलावे, याचा सूर गवसत नसेल तर त्याचे आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन त्या नेत्यांनीच करायला हवे. आपल्या भाषणामुळे लोकांना एखादा विचार मिळावा, सभा संपवून घरी जाणाऱ्यांच्या डोक्यात विचारांचा भुंगा सोडून मतदारांचे मतपरिवर्तन करता यावे, एवढी ताकद जाहीर सभांमधून होणाऱ्या भाषणांमध्ये पूर्वी तरी असे. मात्र, ‘मी दिवसभरात वीस सभा केल्या,’ असे सांगण्याची स्पर्धा लागलेल्या काळात पहिल्या आणि विसाव्या सभेत आपण काय बोललो, हे देखील नेत्यांच्या लक्षात राहत नसेल, तर ते दुर्दैवच म्हणावे लागेल.
मध्यंतरीच्या काळात काही नेते स्क्रिप्ट रायटरकडून भाषण लिहून घ्यायचे. हशा आणि टाळ्या कुठे येऊ शकतात, ते देखील लिहायला सांगायचे. त्यांचाही काळ गेला. आता ‘दिसली सभा की ठोक भाषण’ या वृत्तीने कोणीही उठतो आणि कुठेही, काहीही बोलतो. असल्या भाषणबाज नेत्यांनी महाराष्ट्राचे सामाजिक आणि सांस्कृतिक स्थैर्य मातीमोल करणे सुरू केले आहे. आधी वाट्टेल ते बोलून नंतर दिलगिरी व्यक्त करणारे रवींद्र चव्हाण हे त्यातले ताजे उदाहरण. आता पुढल्या आठवडाभराच्या प्रचाराच्या धुरळ्यात कुणाचे पाय आणखी किती खोलात जाणार; कोण जाणे !