लेख: राजकारणात निष्ठा वगैरे काही नसते रे, भाऊ! सत्तेच्या समीकरणांत सगळं भाषणापुरतंच!

By यदू जोशी | Updated: January 23, 2026 07:25 IST2026-01-23T07:25:06+5:302026-01-23T07:25:41+5:30

अंकगणितच अंतिम सत्य ठरते. निकालानंतरच्या चिखलात सध्या हे एकच सत्य मागे उरले आहे!

article on loyalty in politics and equation of power is what matters | लेख: राजकारणात निष्ठा वगैरे काही नसते रे, भाऊ! सत्तेच्या समीकरणांत सगळं भाषणापुरतंच!

लेख: राजकारणात निष्ठा वगैरे काही नसते रे, भाऊ! सत्तेच्या समीकरणांत सगळं भाषणापुरतंच!

यदु जोशी, राजकीय संपादक, लोकमत

महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर सर्व २९ शहरांमध्ये कोण महापौर होणार याचे अंदाज वर्तविणे सुरू झाले आहे. गेल्या दोन-चार दिवसांत माध्यमांनी भरपूर पतंगबाजी केली. अनुसूचित जमातीचा नगरसेवकच भाजप-शिंदेसेनेकडे नाही, त्यामुळे बहुमत त्यांचे असले तरी महापौरपद उद्धवसेनेकडे जाणार इथपर्यंत पतंगबाजी करून झाली. आत्मविश्वासाने भाकिते वर्तविली गेली. मात्र, आधी आकाशात झुलणाऱ्या पुड्या सोडतीनंतर कचराकुंडीत गेल्या. सोडत निवडणुकीच्या आधी घ्यावी, असा कोणताही नियम नाही. अन् आधी सोडत केली असती तर ज्या प्रवर्गासाठी महापौरपद राखीव आहे तिथे पाडापाडीचे पक्षांतर्गत राजकारण झाले असते. बंडखोरीही झाली असती. अमूक एका वर्गासाठी पद राखीव आहे म्हटल्यानंतर इतर प्रवर्ग मतदानाबाबतही उदासीन राहू शकतात. सोडत कधी काढायची हे नगरविकास विभागाच्या म्हणजे सरकारच्या हाती असल्याने निकालानंतरची तारीख ठरविली गेली हे उघड आहे.

निकालानंतरची एक वेगळीच निवडणूक सध्या दिसते आहे. निष्ठावंतांच्या मांडवातून काही जण कालपर्यंत ज्यांना गद्दार म्हटले त्यांच्या मांडवात दाखल होताना दिसत आहेत. नगरसेवकांची, त्यांच्या निष्ठेची आणि त्यांच्या किमतीचीही निवडणूक सध्या चालली आहे. आधी मतदारांनी उमेदवारांचे मूल्यांकन केले, आता त्यांच्या किमतीची बोली लागली आहे. कालपर्यंत ज्या मांडवात निष्ठा, तत्त्वनिष्ठेची भाषणे रंगत होती, त्याच मांडवाला गळती लागली आहे.

२०१७ मध्ये जिंकलेले राज ठाकरे यांचे सात नगरसेवक उद्धव ठाकरेंनी पळविले होते. आता कल्याण-डोंबिवली व इतर ठिकाणीही या दोघांचे नगरसेवक एकनाथ शिंदे पळवत आहेत. राजकारणात सूड हा चक्राकार असतो; आज जो पळवतो; उद्या तो पळविला जातो. काही वर्षांनंतर ही वेळ भाजपवर येऊ शकेल. एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो आहोत, अशी ग्वाही उद्धव ठाकरेंनी दिली होती, पण त्यांच्या आणि राज यांच्या भरवश्यावर निवडून आलेले नगरसेवक चारच दिवसात साथ सोडून जात आहेत. खरेतर या दोन भावांचा भाजपइतकाच किंवा त्यापेक्षा थोडा जास्तच शत्रू म्हणजे एकनाथ शिंदे पण त्याच शिंदेंच्या पक्षाला महापौरपद मिळावे यासाठी दोन्ही पक्षांचे नगरसेवक त्यांच्या तंबूत दाखल होत आहेत. चंद्रपूर, अमरावती, अकोल्यात भाजपकडून उद्धवसेनेचे नगरसेवक ओढले जात आहेत. आपले नगरसेवक ठाकरे यांना सांभाळून ठेवता येत नाहीत, असे दिसते. 
आज चार-आठ लोक गेले, पुढे आणखी गळती लागू शकते. ‘स्थानिक राजकारणाचा विचार करून आमच्या नगरसेवकांनी निर्णय घेतला असेल, त्यांचा निर्णय ही आमच्या पक्षाची भूमिका नाही’, ही मनसेच्या नेत्यांची प्रतिक्रिया तर निष्ठेलाही चक्रावून टाकणारी आहे. 

सत्तेच्या समीकरणांत निष्ठा केवळ भाषणापुरती उरते आणि निर्णायक क्षणी अंकगणितच अंतिम सत्य ठरते. उद्धवसेनेच्या नगरसेवकांना तर रात्रीतून शत्रू लोभस मित्र वाटू लागले आहेत. नगरसेवकांची निष्ठा इतकी तकलादू का असते? पक्ष म्हणजे वाहन आणि सत्ता म्हणजे त्या वाहनाने गाठावयाचे ठिकाण असे गृहित धरले तर चालक (नगरसेवक) दिशा बदलतो. विचारसरणी ही प्रचारासाठी वापरायची भाषा ठरते. प्रत्यक्ष प्रवास मात्र सत्तेकडेच असतो.

तावडेंची कठीण परीक्षा

केरळमध्ये चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे निवडणूक प्रभारी म्हणून राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. केरळमध्ये भाजपचा एकही आमदार नाही. वाळूचे कण रगडून तेल काढण्याचे काम तावडेंकडे दिले आहे. चांगले काम करणाऱ्याला अधिक काम दिले जाते, तसे तावडेंबाबत झाले आहे. ते बिहार भाजपचे प्रभारी सरचिटणीस आहेत, तिथे भाजप-जदयु युती पुन्हा सत्तेत आली. तावडेंनी पडद्यामागे, पडद्यासमोर खूप काही केले. आता केरळमध्ये कमळ फुलवायची जबाबदारी या मराठी नेत्याकडे सोपविली आहे. आधी तावडे दिल्लीत रमले होते, आता जमले आहेत.

असे आहेत नितीन नबीन

नितीन नबीन किती पारदर्शकपणे काम करतात याचा एक किस्सा परवा दिल्लीतील एका नेत्यानेच सांगितला. बिहारचे सर्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांच्या खात्यामार्फत सहाशे कोटी रुपयांची कामे करावयाची होती. ती कामे कोणकोणती आहेत, प्रत्येक कामाची किंमत किती आहे, त्याची निविदा प्रक्रिया कशी पारदर्शकपणे राबविली जाणार आहे आणि त्यात आपला स्वत:चा कोणताही हस्तक्षेप राहणार नाही, असा सगळा अहवाल नितीन नबीन यांनी आधीच पक्षनेतृत्वाला देऊन टाकला. आता त्याच नितीन नबीन यांनी देशभरातील भाजपच्या मंत्र्यांसाठी आचारसंहिता आणली तर अनेकांची पंचाईत होवू शकते...

जाता जाता : अजित पवार यांच्या पक्षाचे नाव राष्ट्रवादी अजित पवार पक्ष, राष्ट्रवादी (अ.प.), राष्ट्रवादी (अजित पवार गट) असे तर शरद पवार यांच्या पक्षाचे नाव राष्ट्रवादी शरद पवार गट, राष्ट्रवादी (श.प.), राष्ट्रवादी (शरद पवार गट) असे वेगवेगळ्या पद्धतीने माध्यमांमधून लिहून येते. अजितदादा, संपवून टाका एकदाचा गोंधळ. पूर्वीसारखे एकच राष्ट्रवादी काँग्रेस असे नाव लिहून येईल. ‘एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी’ असे राज ठाकरेंच्या साक्षीने उद्धव ठाकरे म्हणाले होते. तुम्ही पुतणे-काका एकत्र आला आहातच, एक होणे तेवढे बाकी आहे.

yadu.joshi@lokmat.com

Web Title : राजनीति: निष्ठा एक भ्रम, सत्ता समीकरण ही सब कुछ!

Web Summary : चुनाव के बाद, महाराष्ट्र की राजनीति में निष्ठाएं बदल रही हैं। पार्षद सत्ता के लिए पक्ष बदल रहे हैं, जिससे वैचारिक प्रतिबद्धता खोखली साबित हो रही है। पार्टियों के बीच खींचतान बढ़ रही है, जो सिद्धांतों पर राजनीतिक गणित की प्रधानता को उजागर करती है।

Web Title : Politics: Loyalty is an Illusion, Power Equations Trump All!

Web Summary : Post-election, shifting loyalties dominate Maharashtra politics. Corporators switch sides for power, exposing the hollowness of ideological commitment. Turf wars intensify between parties, highlighting the supremacy of political arithmetic over principles.