नशीब असावं तर असं! राष्ट्रवादीतून भाजपात आल्या आणि २४ तासांत झाल्या नगरसेविका, धुळ्यात उज्वला भोसले बिनविरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 16:34 IST2025-12-31T16:33:52+5:302025-12-31T16:34:29+5:30
धुळ्यात छाननीनंतर प्रभाग १ मधून उज्वला भोसले बिनविरोध निवडून आल्या आहेत.

नशीब असावं तर असं! राष्ट्रवादीतून भाजपात आल्या आणि २४ तासांत झाल्या नगरसेविका, धुळ्यात उज्वला भोसले बिनविरोध
Dhule Municipal Corporation Election 2026: धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदानाची तारीख उजाडण्यापूर्वीच भारतीय जनता पक्षाने विजयाचे खाते उघडले आहे. प्रभाग क्रमांक १ मधून भाजपच्या उमेदवार उज्वला रणजीतराजे भोसले यांची बिनविरोध निवड झाली असून, धुळे मनपाच्या या निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळणाऱ्या त्या पहिल्या नगरसेविका ठरल्या आहेत.
छाननी प्रक्रियेत विरोधक क्लीन बोल्ड
बुधवारी पार पडलेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननी प्रक्रियेत राजकीय नाट्य पाहायला मिळाले. प्रभाग १ मधून उज्वला भोसले यांच्या विरोधात एकूण चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, तांत्रिक कारणांमुळे आणि अर्जातील त्रुटींमुळे या चारही विरोधी उमेदवारांचे नामांकन अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद ठरवले. मैदानात केवळ उज्वला भोसले यांचाच एकमेव वैध अर्ज शिल्लक राहिल्याने, त्यांचा बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.
निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा अन् प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) शहर जिल्हाध्यक्ष रणजीतराजे भोसले यांनी निवडणुकीच्या ऐन धामधुमीत आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. त्यांनी पक्ष सोडून थेट भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या पत्नी उज्वला भोसले यांना भाजपने प्रभाग १ मधून मैदानात उतरवले. शरद पवारांच्या शिलेदाराने 'कमळ' हाती घेताच दुसऱ्या दिवशी त्यांची पत्नी बिनविरोध निवडून आली.
भाजपच्या रणनीतीचा मोठा विजय
उज्वला भोसले यांचा हा बिनविरोध विजय म्हणजे भाजपच्याराजकीय नियोजनाचा भाग मानला जात आहे. निवडणूक होण्यापूर्वीच एक जागा खिशात टाकल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला असून शहरात ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे. या निकालामुळे उर्वरित प्रभागांमधील भाजप उमेदवारांना मोठे मानसिक बळ मिळाले असून, विरोधकांवर मात्र यामुळे दबाव वाढल्याचे बोलले जात आहे.
निवडणूक खर्चात बचत, भाजपला आत्मविश्वास
या बिनविरोध निवडीमुळे प्रभाग १ मधील निवडणूक प्रक्रिया आता थांबणार असून प्रशासकीय आणि राजकीय पक्षांच्या निवडणूक खर्चात मोठी बचत होणार आहे. भाजपने मिळवलेली ही पहिली जागा संपूर्ण निवडणुकीत सत्तेचे समीकरण कोणाकडे झुकणार, याचे संकेत देत असल्याची चर्चा सुरु झालीय.