धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 10:43 IST2025-12-25T10:41:20+5:302025-12-25T10:43:37+5:30
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे चार दिवस शिल्लक असतानाही जागा वाटपाचे सूत्र निश्चित न होणे, हे कार्यकर्त्यांमधील अस्वस्थतेचे मुख्य कारण ठरत आहे.

धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
राजेश शर्मा
धुळे - नगरपालिका निवडणुकीप्रमाणेच धुळे महानगरपालिका निवडणुकीतही राजकीय वितुष्टाची धार तीव्र झाली आहे. मित्रपक्षांतील नेत्यांमधील अंतर्गत संघर्ष आणि 'मोठा भाऊ' ठरण्याच्या जिद्दीपायी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये पेच निर्माण झाला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास केवळ चार दिवस उरले असताना, अद्याप जागावाटपाचे चित्र स्पष्ट झालेले नाही. परिणामी, सर्वच पक्षांनी 'स्वबळावर' लढण्याची तयारी समांतरपणे सुरू ठेवली आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे चार दिवस शिल्लक असतानाही जागा वाटपाचे सूत्र निश्चित न होणे, हे कार्यकर्त्यांमधील अस्वस्थतेचे मुख्य कारण ठरत आहे. ज्या प्रभागात ज्या पक्षाचा नगरसेवक आहे, ती जागा त्या पक्षालाच मिळावी, असा आग्रह धरला जात आहे. मात्र, बदललेली राजकीय समीकरणे पाहता मित्रपक्ष त्या जागांवर दावा सांगत आहेत.
महायुतीचा पेच, यशामुळे वाढला आत्मविश्वास
नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपा, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) स्वतंत्र लढले होते. त्यात भाजपला शिरपूर, दोंडाईचात यश मिळाले, तर शिंदखेड्यात राष्ट्रवादीने बाजी मारली होती. याच यशामुळे महायुतीतील नेत्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. जागा वाटपात तिघांपैकी कोणीही माघार घ्यायला तयार नाही. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत कोअर कमिटीची बैठक झाली. मात्र, त्यात कोणताही ठोस तोडगा निघू शकला नाही. प्रत्येक पक्षाला आपल्या अस्तित्वासाठी आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी जास्तीत जास्त जागा हव्या आहेत, ज्यामुळे महायुतीत "ओढाताण" सुरू आहे.
मुस्लीमबहुल प्रभागांतील आघाडीची रणनीती
शहरातील १४ मुस्लिमबहुल नगरसेवकांच्या जागांवर सर्वांचे लक्ष आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाने येथे उमेदवार दिले नव्हते आणि यंदाही आमदार अनुप अग्रवाल यांनी तीच भूमिका स्पष्ट केली आहे. गेल्या वेळी या १४ जागांपैकी ७ काँग्रेस, ४ एमआयएम आणि उर्वरित सपा व राष्ट्रवादीकडे होत्या. यंदा या जागांवर कोणाचे वर्चस्व राहणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल
महाविकास आघाडीची नवी समीकरणे आणि मनसेची एन्ट्री
महाविकास आघाडीमध्ये आतापर्यंत उद्धवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) हे तीन मुख्य घटक पक्ष होते. मात्र, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) समावेश झाल्याने या आघाडीचे स्वरूप बदलले आहे. मनसेच्या नेत्या प्राची कुलकर्णी आणि अन्य पदाधिकारी हे आघाडीच्या बैठकांना उपस्थित राहिल्याने, मनसे आता महाविकास आघाडीच्या रणनीतीचा भाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. आघाडी झाली असली, तरी 'जागा वाटप' हा सर्वात कठीण टप्पा मानला जात आहे. प्रत्येक पक्ष आपल्या निवडून येण्याची क्षमता असलेल्या जागांवर दावा सांगत आहे. त्यात आता मनसेला सोबत घेतल्यामुळे, त्यांच्यासाठी कोणत्या आणि किती जागा सोडायच्या, हा नवा प्रश्न मित्रपक्षांसमोर आहे.
दरम्यान, जागा वाटप झाले नसतांना काँग्रेसतर्फे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवनात कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन मंगळवारीच आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला आहे. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे, त्यामुळे ते जास्तीत जास्त जागांसाठी आग्रही आहेत. प्रचारात आघाडी घेतली असली, तरी मित्रपक्षांना सोबत घेतल्याशिवाय विजय सोपा नाही, याची जाणीवही काँग्रेस नेत्यांना आहे. केवळ जागा लढवणे महत्त्वाचे नसून, ती जिंकणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक जागेचे 'मेरिट' तपासले जात आहे. तसेच जागावाटप जाहीर झाल्यानंतर ज्यांना तिकीट मिळणार नाही, ते बंडखोरी करू शकतात किंवा दुसऱ्या आघाडीत जाऊ शकतात. ही भीती टाळण्यासाठी आघाडीच्या वाटाघाटी अत्यंत गोपनीय आणि सावधपणे सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.