भाजप उमेदवारांच्या नावांचा फैसला आज मुंबईत; कोअर कमिटीच्या उपस्थिती मुख्यमंत्री घेणार निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 15:39 IST2025-12-26T15:39:48+5:302025-12-26T15:39:48+5:30
उमेदवारी न मिळालेले इच्छूक बंडखोरी करणार नाहीत

भाजप उमेदवारांच्या नावांचा फैसला आज मुंबईत; कोअर कमिटीच्या उपस्थिती मुख्यमंत्री घेणार निर्णय
धुळे : महापालिका निवडणुकीसाठी भाजपाकडे तब्बल साडेपाचशे उमेदवार इच्छुक आहेत, प्रत्येकाला उमेदवारी देणे शक्य नसले तरी या निवडणुकीत पक्षाने समतोल राखत उमेदवारांची निवड केली आहे. शुक्रवारी स्थानिक कोअर कमिटी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उमेदवार यादी जाहीर करणार आहेत, अशी माहिती पत्रपरिषदेत पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
शहरातील आमदार कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार अनूप अग्रवाल, माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, आदीसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
युतीबाबत चर्चा सुरू
राज्यात महायुतीचे सरकार असल्याने वरिष्ठस्तराव युतीबाबत चर्चा सुरू आहेत. शुक्रवारी उमेदवार निश्चित झाल्यावर युतीबाबत अधिकृत माहिती कळविली जाईल असे मंत्री रावल यांनी सांगितले.
बंडखोरी होणार नाही
उमेदवारी जाहीर करतांना सर्वच स्तरावर विचार केला जातो, त्यामुळे विलंब होतो. भाजप हा विचारधारेवर चालणार पक्ष आहे. त्यामुळे उमेदवारी न मिळालेले इच्छूक बंडखोरी करणार नाहीत, याची खात्री असल्याचे रावलांनी सांगितले.
आजी माजीसह नव्यांना संधी
उमेदवारी देतांना युवा, युवती, आजी माजीसह व्यापारी तसेच जातीय समतोल राखून सर्वस्तरावर काम करणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांचा विचार करण्यात आला आहे.