Dhule: शिंदेसेनेच्या उमेदवार गीता नवले यांची फेसबुकवरून बदनामी, नेमका प्रकार काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 13:44 IST2026-01-07T13:43:34+5:302026-01-07T13:44:48+5:30
Dhule Municipal Corporation Election: राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत सोशल मीडियाचा गैरवापर करून उमेदवारांना लक्ष्य करण्याचे प्रकार समोर येत आहेत.

Dhule: शिंदेसेनेच्या उमेदवार गीता नवले यांची फेसबुकवरून बदनामी, नेमका प्रकार काय?
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत सोशल मीडियाचा गैरवापर करून उमेदवारांना लक्ष्य करण्याचे प्रकार समोर येत आहेत. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार गीता नवले यांची फेसबूकवरून बदनामी करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात संताप व्यक्त केला जात असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
नेमका प्रकार काय?
मिळालेल्या माहितीनुसार, गीता नवले यांच्या नावाने फेसबुकवर एक फेक अकाउंट तयार करण्यात आले. 'सौ. गीता नवले समर्थक' या नावाने चालवल्या जाणाऱ्या या पेजवरून त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर पोस्ट करण्यात आला आहे. केवळ प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने हे कृत्य केले जात असल्याचा आरोप नवले यांनी केला आहे.
आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी
या प्रकारानंतर गीता नवले यांनी धुळे शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली. तसेच या प्रकरणाची सविस्तर माहिती सायबर पोलिसांनाही देण्यात आली आहे. बनावट खाते तयार करून खोटी माहिती पसरवणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन त्याला तात्काळ अटक करावी आणि कठोर शिक्षा करावी, अशी मागणी गीता नवले आणि त्यांच्या समर्थकांनी केली आहे.
गीता नवले काय म्हणाल्या?
"माझ्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार करून मला बदनाम करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. निवडणुकीच्या काळात अशा प्रकारे खालच्या थराचे राजकारण करणे चुकीचे आहे. मी याप्रकरणी पोलीस तक्रार दिली असून, सायबर विभागाने लवकरात लवकर आरोपीला शोधून काढावे", असे गीता नवले म्हणाल्या.